औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील भगूर फाट्यानजीक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाच्या ताब्यातील वाळूचे ट्रॅक्टर माफियांनी हिसकावून नेल्याची घटना ताजी असतानाच माफियांनी पुन्हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. १०) तालुक्यातील जळगाव शिवारात घडली. दोघाही कर्मचाऱ्यांनी वेळीच सावधानता राखल्याने मोठा अनर्थ टळला.
गेल्या काही दिवसांपासून माफियांनी वाळूपट्टयात धुमाकूळ घातला आहे. विशेषतः गोदाकाठच्या गावांतील पात्रांसह शिवना नदीच्या पात्रात वाळूमाफियांचा हैदोस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्या आदेशानुसार कारकून दीपक त्रिभुवन व महेश शिंदे हे तालुक्यातील जळगाव येथे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेले. या दोघांनीही रस्त्यावर दुचाकी आडवी उभी करून चालकास वाहन थांबविण्यास सांगितले.
यावेळी चालकाने थेट त्यांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचारी प्रसंगावधान राखत कसेतरी बचावले. परंतु कर्मचाऱ्यांनी हिंमत न हारता दुचाकीवरून त्या टिप्परचा तब्बल १० किलोमीटर पाठलाग करून अखेर त्याला नागपूर-मुंबई महामार्गावरील करंजगाव नजीक असलेल्या परसोडा फाट्यावर पकडले व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या एका चालकास बोलावून ते वाहन ताब्यात देऊन सरळ ते वैजापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
टिप्परचा मालक अमोल निघोटे हा तेथे आला असता कर्मचाऱ्यांनी त्याला वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. याशिवाय वाहनाच्या मागे अथवा पुढे क्रमांकही लिहिलेला नव्हता. दरम्यान या घटनेनंतर तालुक्यातील करंजगाव येथील तलाठ्यास बोलावून पंचनामा केला. वाहनामध्ये दोन ब्रास वाळू आढळून आली. त्यामुळे बाजार भावाच्या पाचपटीनुसार अमोल निघोटे याला २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘स्पष्ट बोलता न आल्याने मित्र चिडवाचे’; शरद केळकरने सांगितला अनुभव
- ‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याइतपत राज्य सरकार बेपर्वा झालेय’, भाजपची टीका
- ‘विरोधकांनी देशाची माफी मागावी’, केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद
- तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता
- ‘…याची उत्तरे द्या अन्यथा राजीनामा द्या’, पडळकरांचे मंत्री वड्डेटीवारांना पत्र


