नाशिक : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बुधवारी दिवसभरात २० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. आज दिवसभरात २३ हजार १७९ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ९ हजार १३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण २१ लाख ६३ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
एकाच दिवशी २० हजारांहून अधिक रुग्णांची वाढ झाल्यामुळे राज्यातील सध्याचा ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा १ लाख ५२ हजार ७६० पार गेला आहे. अशावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. सरकारनं दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जात आहे. कारवाई केली तर ती फार कठोर असेल. अनिश्चित काळासाठी दुकानं बंद करण्याची कारवाई होऊ शकते, असं भुजबळ म्हणाले.
कोरोना बरा होतो मात्र काहींना कायमचं दुखणं देतो. खासगी रुग्णालय किंवा खासगी लॅबने रुग्णांची माहिती सरकारी यंत्रणांना देणं आवश्यक आहे. नागरिक जबाबदारीनं वागले नाही तर पुन्हा पूर्ण लॉकडाऊन करायचा निर्णय लांब नाही. अर्थचक्र थांबवायचं नसेल तर बंधनं पाळा, अशी विनंतीही भुजबळ यांनी नाशिककरांना केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून उर्मिला मातोंडकरांनी खास ट्विट करून आदित्य ठाकरेंचं केलं अभिनंदन
- ‘वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन,’त्या’ व्यक्तीने दिले होते राम मंदिरासाठी १५ कोटी’
- महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून
- राज्यात कोरोनाचे थैमान लवकरच लागणार कडक निर्बंध, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
- शिवसेनेच्या बाणाने भाजप घायाळ, जळगावात सत्ता हिसकावली !


