मुंबई : तीन आणि पाच हॉर्सपावर (एचपी) विद्युत क्षमता असलेल्या कृषी पंपास सौर ऊर्जा पद्धतीने वीज वितरीत करण्यात येते. तर, पाच हॉर्स पावरपेक्षा जास्त विद्युत क्षमता असलेल्या कृषी पंपास पारंपरिक पद्धतीने वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात २५००० नग सौर कृषीपंप महावितरणमार्फत आस्थापित करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
आज विधानसभेत सदस्य नसीम खान यांनी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री. बावनकुळे बोलत होते. बावनकुळे म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व इतर उद्दिाष्ट साध्य करण्याच्या दृष्टीळने पारेषणविरहीत एक लक्ष सौर कृषीपंप, टप्प्याटप्प्याने आस्थापित करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत एक लाख ५५ हजार ४९७ कृषी पंपासाठी अर्ज प्राप्त होते. त्यापैकी पात्र ठरलेल्या ६४ हजार पैकी २५ हजार सौर कृषी पंप सुरू करण्यात आले असल्याची माहिती बावनकुळे यांनी आज दिली. पाच एचपीच्या वर विद्युत क्षमता असलेल्या पंपास पारंपरिक पद्धतीने वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर अर्ज केलेल्या अपात्र शेतकऱ्यांनी निकषांची पूर्तता केल्यास त्याच्या अनुज्ञेयतेनुसार सकारात्मक विचार करण्यात येईल.
बावनकुळे यांनी, उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले, मागेल त्याला शेततळे या योजनेची अंमलबजावणी करताना सौरऊर्जापंपाची जोडणी देण्यात येणार. याव्यतिरिक्त ज्यांना सौर कृषी पंप घ्यावयाचे आहेत त्यांनी ते घ्यावेत अथवा ज्यांना पारंपरिक वीज जोडणीने कृषी पंप घ्यावयाचे आहेत त्यांनी पारंपरिक पद्धतीने घ्यावा, अशी माहितीही बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

