🕒 1 min read
इंदापूर: सध्याच्या काळात काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जात आहे. एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. पण आता ती राहिली आहे का माहिती नाही, अशी खंत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी सुशीलकुमार शिंदे आज इंदापूर मध्ये आले होते. यावेळी सुशीलकुमार यांनी पक्षाच्या सद्यस्थिती विषयी खंत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
1974-75 च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबीरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडताना दिसत नाही. आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणे अवघड झाले आहे. काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या शब्दाला पक्षात पूर्वीइतकी किंमत उरली आहे किंवा नाही, अशी साशंकताही त्यांनी बोलून दाखविली.
कॉंग्रेसच्या ज्या वैचारिक परंपरेबद्दल शिंदे बोलत आहेत ती कधीच लयाला गेली आहे असे म्हटले तरीही काही वावगे ठरणार नाही. एका परिवारातील सदस्यांच्या दावणीला जर अख्खा पक्ष बांधला जात असेल तर वैचारिक परंपरा कशी टिकणार या प्रश्नापासून या चर्चेला सुरुवात करावी लागेल. स्वतःला पुरोगामी मानणाऱ्या कॉंग्रेसने हिंदुत्वादी शिवसेनेच्या सोबत जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा देखील या वैचारिक परंपरेबाबत मंथन होणे आवश्यक होते मात्र केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने आपले ब्रह्मचर्य गमावले असे म्हटले तर काहीही चुकीचे ठरणार नाही.
इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना मानाचे पान देणे, राष्ट्रवादीच्या कुरघोड्या दिसत असूनही दुर्लक्ष करणे,तरुण कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून न घेणे, बहुसंख्यांकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून तुष्टीकरणाचे राजकारण करत राहणे, जनसंपर्क न ठेवणे याचे दुष्परिणाम पक्ष सध्या कॉंग्रेस पक्ष भोगत आहे. आपल्या विचारधारेशी प्रामाणिक न राहणारा पक्ष राजकारणात टिकू शकेल का याचा देखील विचार होणे आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा राहुल गांधी यांनाच विराजमान करण्याची तयारी सुरू झाली. ही प्रक्रिया सुरू असताना सोनिया गांधी यांना २३ नेत्यांनी सह्या करुन पाठवलेले एक पत्र लीक झाले.पत्रामधून पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची तसेच अध्यक्षपदासाठी नवा विचार करण्याची मागणी पुढे आली होती त्यावेळी किती मोठा हलकल्लोळ माजवण्यात आला होता हे शिंदे यांनी लक्षात घ्यायला हवे.
ज्यांनी पत्रावर सह्या केल्या होत्या त्यांच्यावर भाजपशी मैत्री केल्याचा आरोप करण्यात आला. त्या पत्रावर सही करणाऱ्या अनेकांचे आयुष्य कॉंग्रेससाठी संघर्ष करण्यात गेले आहे. त्यांच्यावरच भाजपसोबत असल्याचा आरोप होणे हे किती वेदनादायक असू शकते याची कल्पना न केलेलीच बरी. याआधी इंदिरा गांधी काँग्रेसचे नेतृत्व करत असतानाही पक्षात मतभेद होते आणि पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली जात होती. पण पत्र लिहिले म्हणजे एकदम पक्षविरोधी ठरवणे चुकीचे आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे पक्षाची वैचारिक परंपरा आता नव्हे तर यापूर्वीच लयाला गेली आहे असे म्हटले तर त्यात काहीही चुकीचे नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘चिलापी मासे मीच उजनी धरणाच्या जलाशयात सोडले!’; पवारांनी सांगितली आठवण
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही असे छातीठोकपणे सांगणारे देशमुख आज पळवाट शोधत आहेत ?
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
