मुंबई : कोरोना महामारीच्या संकटकाळात गृहनिर्माण विभागातर्फे बांधकाम व्यावसायिकांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. त्याचा उपयोग करून राज्यातील गोरगरिबांना घरांचा लाभ देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा, शासनास सहकार्य करावे. गृहनिर्माण उद्योगाला उभारी देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केले.
परळच्या हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे दैनिक लोकसत्ताने आयोजित केलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.
गृहनिर्माण मंत्री आव्हाड म्हणाले, मुंबई व आसपासच्या परिसरात पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत कामांना गती देण्यासाठी मंजुरीची प्रक्रिया अधिक सोपी व सुटसुटीत करण्यात आली आहे. परंतु असे असले तरी पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. अशा परिस्थितीत जर विकासक प्रकल्पाचे काम सुरू करणार नसेल तर असे प्रकल्प म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ताब्यात घेऊन स्वतः पुनर्विकास करेल असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे काम आता प्रत्यक्ष सुरू झालेले आहे.बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न होता. तोही सोडविण्यात आला आहे. २००७ पासून प्रलंबित असलेला गोरेगाव पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्प मार्गी लागला असून मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी मिळाली आहे. पुढील महिन्यात त्याचे काम सुरू होईल. पत्राचाळीतील ६७२ मूळ रहिवासी बाहेर असून त्यांच्यासाठी आधी पुनर्वसन इमारत बांधण्यात येईल अशी माहिती आव्हाड यांनी दिली.
म्हाडा वसाहतींचे मुंबईत 56 अभिन्यास आहेत. यापैकी बहुतेक अभिन्यास एकत्रितरीत्या विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.याचा फायदा रहिवासी आणि विकासकांनाही होणार आहे. मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व दुरुस्ती मंडळाने पुनर्रचित इमारतींचा जलद गतीने पुनर्विकास करण्यासाठी तसेच समूह पुनर्विकास योजनेस प्रोत्साहन देण्यासाठी विकास नियंत्रण नियमावली 33(7) व 33(9) मधील तरतुदीमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत असे आव्हाड यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परळीतील त्या अंगार, भंगारवाल्या घोषणा मी ऐकल्याच नाहीत’, मंत्री भागवत कराडांची प्रतिक्रिया
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- नाराजी कायम! मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांची पाठ
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच’; पोलिसांच्या धरपकड कारवाईनंतर पडळकर आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
