तुळजापूर : कोटा, राजस्थान येथील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील अंदाजे १००० विद्यार्थ्यांना परत आणावे अशी मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांच्या (यु.पी.एस.सी., आय.आय.टी.-जे.ई.ई.,सी.ई.टी. आदी) तयारीसाठी कोटा, राजस्थान येथे आहेत. लॉकडाऊनच्या या कालखंडात त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे व परत महाराष्ट्रात येण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा चालु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील कु. भक्ती बापू घोगरे या विद्यार्थीनीने ही बाब फोनद्वारे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.
या अनुषंगाने आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी कोटा, राजस्थान येथील कोटाचे जिल्हाधिकारी श्री. ओमप्रकाश कसेरा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अंदाजे १००० विद्यार्थी येथे आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व इतर काही राज्यातील सरकारने त्यांच्या विद्यार्थ्यांना परत नेहण्याची सोय केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
सध्यस्थीतीत ३ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देखील या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुळ गावी पोहोचविणे अत्यावश्यक असून याबाबत तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. यासाठी आपण संबंधीतांना याबाबत आदेशीत करावे, अशी मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


