मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ होते. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरातमध्ये असल्याने एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडणार का? अशी चर्चा सुरू आहे. या पाश्वर्भूमीवरून भाजपकडून त्यांच्या १०६ आमदारांना परराज्यात नेण्याची तयारी सुरु असल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भाजप त्यांच्या आमदारांना गोवा किंवा गुजरातमध्ये नेणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपची सरकार स्थापनेची फिल्डिंग सुरु आहे अशी चर्चा रंगू लागल्या आहेत. यासह कॉंग्रेसच्या देखील सर्व आमदारांचे लोकेशन ट्रेस करणे सुरु आहे. आता कॉंग्रेस देखील खबरदारी म्हणून आमदारांची शोधाशोध घेत आहे. तसेच कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत येईपर्यंत सर्व आमदारांचे लोकेशन ट्रेस केले जाणार आहे. शिवसेनेत फुट पडल्याने भाजप व कॉंग्रेस सावध झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
या प्रकरणी शरद पवार यांची भूमिका –
एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात शिवसेनेची भूमिका पाहणे महत्वाचे आहे. त्यानुसार आमचीही भूमिका स्पष्ट केली जाईल. असे सांगतानाच जर सेना भाजपसोबत गेलीच तर आम्ही विरोधात बसण्याच्या तयारीत असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर दिल्लीत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली”.
महत्वाच्या बातम्या –


