बीड : मराठा आरक्षणाचा विषय सध्या पेटला असून राज्य सरकारने जर आरक्षण दिले नाही तर आम्ही पुन्हा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारला सोमवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या विराट मोर्चातून दिला.
धस यांच्या मोर्चाच्या बॅनरवर पक्षातील राज्यातील व जिल्ह्यातील नेतृत्वाचे फोटो होते. शिवाय संयोजक म्हणून भाजपचा उल्लेख होता. मात्र, तरीही मराठा आरक्षण मोर्चाला केवळ गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार आणि माजलगावचे माजी आमदार आर.टी.देशमुख यांच्या व्यतिरिक्त कोणीही मोठा पदाधिकारी सहभागी झाला नाही. धस यांच्या मोर्चाकडे भाजपच्या जिल्हाध्यक्षासह पक्षाच्या कार्यकर्त्यानेही का पाठ फिरवली याची चर्चा सुरू झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केवळ तीन दिवसात मोर्चाची तयारी केली होती.आष्टी, गेवराई, माजलगाव तालुक्यात त्यांनी बैठका घेवुन समाज बांधवांच्या भेटी घेत मोर्चाला येण्याचे त्यांना निमंत्रण दिले. आमदार धस यांच्या बॅनरवर संयोजक म्हणून भारतीय जनता पार्टी व सुरेश धस मित्रमंडळ बीड जिल्हा असा उल्लेख होता. भाजप पक्षाचे झेंडेही मोर्चात दिसत होते.
त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांपासुन सर्व अगदी सामान्य कार्यकर्ता या मोर्चाला येईल अशी शक्यता वाटत असतांनाच ऐनवेळी मात्र केवळ गेवराई येथील भाजपचे आ.लक्ष्मण पवार व माजलगावचे माजी आमदार आर.टी.देशमुख यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील एकही पदाधिकारी मोर्चाकडे फिरकलाच नाही. आमदार सुरेश धस यांचे जिल्ह्यातील वाढते वर्चस्व पाहता पक्षातील काही ‘जेष्ठ’ नेत्यांनीच भाजप पदाधिकाऱ्यांना या मोर्चाकडे फिरकायचेच नाही असा कानमंत्र दिला होता की काय अशी चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेडमध्ये मानपान नाट्य; खा.चिखलीकर आणि आ.शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पाहा व्हिडिओ
- ‘सत्तेसाठी भाजप नेत्यांची धडपड सुरू’, अशोक चव्हाणांची टीका
- ‘जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?’, भाजप आ.अतुल भातखळरांचा सवाल
- अण्णा पुन्हा दिसणार; ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिका लवकरच येणार भेटीला
- आपल्या वैचारिक परंपरेशी प्रामाणिक न राहणारा पक्ष राजकारणात टिकू शकेल का ?


