मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावर महत्वाचं विधान केलं आहे.
आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काहीही झालं तरी भाजप ओबीसींना आरक्षण देणारच. ओबीसी आरक्षण पुन्हा परत मिळत नाही, तोवर भाजपचा संघर्ष थांबणार नाही. आगामी काळात ज्या कोणत्या निवडणुका होतील, त्यात २७ टक्के उमेदवारी ही ओबीसींना देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. तशी घोषणा आम्ही पूर्वीच केली आहे”.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा खून केला. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिल्यांदा ट्रिपल टेस्टचा मुद्दा आला. पण या सरकारने केवळ वेळकाढू धोरण अवलंबिले. वारंवार न्यायालयात तारखा मागण्याचे काम केले. सर्वपक्षीय बैठकीत मान्य करायचे आणि नंतर काहीच करायचे नाही, हेच त्यांचे धोरण राहिले. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार एम्पिरिकल डेटा सांगितले तरी जनगणनेचा डेटा की एम्पिरिकल डेटा यातच महाविकास आघाडी सरकारने घोळ घातला. राज्य मागासवर्ग आयोगाने एका महिन्यात अहवाल तयार करण्याची दर्शविली, पण राज्य सरकारने त्यांना सुविधाच दिल्या नाहीत”, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
महाविकास आघाडी समोर कोणतीही समस्या आली की केंद्र सरकारकडे बोट दाखवले जाते. सारेच जर केंद्र सरकारने करायचे ठरवले तर सरकारही केंद्राकडेच चालवायला द्या. तुमचं सरकार काय फक्त वसुलीसाठी आहे का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

