मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आता याप्रकरणात पुढील सुनावणी १९ तारखेला होणार आहे. तर दुसरीकडं, एनआयए सचिन वाझे यांची कसून चौकशी करत होती. यामुळे सचिन वाझे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल १३ तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी ११ वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास १३ तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली आहे.
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असे त्यांना वाटत नाही का’? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
तर, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वाझे यांचा बचाव का केला? हे समजण्यापलीकडचे आहे.आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो व नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो,परंतु येथे समाजातील शांतता भंग करणाऱ्यांचे शिवसेना समर्थन करत होती’. असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, ‘कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना हे सर्व माहित होते आणि तरीही त्यांनी मौन बाळगले? मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्याची उत्तरे महाराष्ट्राची जनताही शोधत आहे. वाझे यांचे समर्थन का केले जात होते? कोणते मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना या संपूर्ण घटनेची कल्पना होती आणि तरीही त्यांनी मौन बाळगले’? असा थेट सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
मात्र जनतेला महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस आणि एनआयएवर पूर्ण विश्वास आहे आणि ते याप्रकरणाचा तपास करुन खऱ्या सूत्रधाराला अटक करुन या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करतील, अशी आशा आहे. अस म्हणत ‘हे केवळ हत्येचे प्रकरण नाही, तर हा देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट होता. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी संशयास्पदरित्या सहभागी होता’. असा गंभीर आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पाठीवर थाप मारण्याचे कारण, पडेगावात तरुणाची हत्या
- मराठा आरक्षण सुनावणीपूर्वी छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- म्युझिक अल्बमच्या प्रमोशनसाठी प्रियांकाचा हॉट लूक, पहा फोटो
- अरे बघताय काय सामिल व्हा… मनसेने घातली तमाम मराठीजनांना साद !
- लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात पण… , वाझेंच्या अटकेनंतर संजय राऊतांचं ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

