गोवा: पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. काल एक्सिट पोल देखील समोर आले आहेत. एक्सिट पोलनुसार गोव्यात कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याची चिन्ह आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी चुरस रंगणार आहे. येत्या १० मार्चला या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. यंदा गोव्यात भाजप आणि काँग्रेस बरोबरच आम आदमी पार्टी आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसलाही काही जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ४० जागांसाठी पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागण्याआधीच भाजपने देवेंद्र फडणवीस यांना गोव्याला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
फडणवीस यंदा गोव्याचे प्रभारी आहेत. त्यामुळे फडणवीसांवर सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी जबाबदारी असणार आहे. भाजपला गोव्यातील सत्ता राखण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीतही गोव्यात भाजपला सत्ता आणण्यासाठी झगडावं लागलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांची खुर्ची कायम ठेवण्यासाठी फडणवीस शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठीच देवेंद्र फडणीस यांना तत्काळ रवाना करण्यात येणार आहे.
अधिवेशन सोडून फडणवीस गोव्याला जाणार
राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ते सोडून फडणवीस दोन दिवसांसाठी गोव्यात जाणार आहेत. गोवा राज्यात भाजप-काँग्रेस सत्ता संघर्ष होण्याची शक्यता वाढल्याने फडणवीस गोव्यात निकाल येण्यापूर्वीच गोव्याला जाणार आहेत. मलिक यांच्याविरोधात मोर्चा झाल्यानंतर फडणवीस गोव्याला रवाना होणार आहेत. आज संध्याकाळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गोव्यातील काही पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातून गोवा आणि उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या आमदार आणि कार्यकर्त्यांनाही बैठकीला बोलवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:


