मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. भोंग्यांचा मुद्दा, हनुमान चालीसा मुद्दा यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष परम टोकाला पोहचलेला आहे. भाजपच्या काही नेत्यांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी होत आहे. आता अशातच भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना गौप्यस्फोट केला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सकाळचा शपथविधी होण्याआधीच दोन वर्षापूर्वी २०१७ मध्येच भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात युतीची चर्चा झाली होती. अशी गोपनीय माहिती आशिष शेलार यांनी कार्यक्रमात बोलून दाखवली. आशिष शेलार म्हणाले, “२०१७ सालीच राष्ट्रवादीसोबत युती करावं असं वाटत होतं. शिवसेनेची वारंवार मिळणारी धमकी, खिशात राजीनामा घालून फिरत असल्याची वक्तव्ये, याला कंटाळूनच राष्ट्रवादीशी युती करावी असं भाजपनं ठरवलं होतं. २०१७ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यावं आणि सत्ता स्थापन करावी अशी चर्चा झाली होती. भाजपच्या नेतृत्वाने नंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं तीन पक्षाचं सरकार स्थापन करू अशी भूमिका घेतली. पण नंतर राष्ट्रवादीने याला नकार दिला.”
आशिष शेलार म्हणाले, यावेळी तीन पक्षाच्या सरकारला राष्ट्रवादीने नकार दिला. आपलं आणि शिवसेनेचं कधी जमणार नाही असं राष्ट्रवादीने सांगितलं. राष्ट्रवादी भाजपसोबत येत असताना भाजपने मात्र शिवसेनेस सोडण्यास नकार दिला. पण २०१९ साली सत्ता दिसताच शिवसेनेने भाजपला सोडण्याची भूमिका सहज घेतली.
यावेळी आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर ही टीका केली. शेलार म्हणाले,” राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर जमणार नाही असं म्हटलं होतं. ते आता शिवसेनेसोबत गेले आहेत. त्यांनी अशी सलगी केली की, जत्रेतले दोन भाऊ हरवले होते असं वाटावं. शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका किती महिन्यात किती वर्षात बदलते, याची साक्षीदार भाजपा आहे.”
महत्वाच्या बातम्या –


