सांगली : राज्यातल्या विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २० जूनला विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान पार पडणार आहे. आता एक मोठी अपडेट हाती येत आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव या निवडणुकीतून सुरुवातीलाच बाजूला पडले आहे. यावेळी त्यांना विश्रांती दिली जाणार असल्याचे भारतीय जनता पक्षाने त्यांना आधीच कळविले आहे. असे असले तरी त्यांनी जागेची मागणी किंवा तशी इच्छा व्यक्त केलेली नाही.
सुरुवातीला लक्ष्मण वडले आणि सदाभाऊ अशी शेतकरी जोडी जोमात होती. त्यानंतर खोत यांनी राजू शेट्टी यांच्याशी जोडी जमवली होती. यानंतर पुन्हा त्यांनी शेट्टींपासून फारकत घेतल्यानंतर सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर अशी नवी जोडी पुढे आली. ही जोडी अनेक आंदोलनात दिसू लागली. त्यांनी विधान परिषदेत आणि रस्त्यावरही एकत्र लढा उभा केला. सुरुवातीला एसटी कर्मचारी यांच्या आंदोलनाचा चेहरा बनले. यासर्व पार्श्वभूमीवर सदाभाऊंना आता सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. परंतु त्यांच्या समर्थकांच्या पदरी निराशा पडली आहे.
विधानसभा, लोकसभा असे पर्याय सदाभाऊ यांच्यापुढे आहे. मात्र ही लढाई त्यांच्यासाठी कठीण असेल. सदाभाऊ विधान परिषदेलाच निवडतील असं दिसतंय. आता पुढील निवडणूक साधारण दोन वर्षांनंतर होणार आहे. पुढच्या निवडणुकीत त्यांना आशा असेल, परंतु त्यासाठी सदाभाऊंना वाट पाहावी लागणार आहे.
आमदारकी साठी इतके दिवस सरकारवर तोंडसुख घेत होता, शेवटी सरसेनापती कडून विश्रांतीचा सल्ला मिळाला. याचा अर्थ तुमची तब्येत ठीक नाही . आता विश्रांती सह राजकीय संन्यास घ्यावा. पक्षाने तुमच्या जड बुद्धीला विश्रांतीचा सल्ला दिलाय. pic.twitter.com/jro7dk91Al
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 27, 2022
दरम्यान सदाभाऊंना विधान परिषद निवडणुकीतून डावलण्यात आल्यामुळे यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी, खोचक ट्विट केले आहे. “आमदारकी साठी इतके दिवस सरकारवर तोंडसुख घेत होता, शेवटी सरसेनापती कडून विश्रांतीचा सल्ला मिळाला. याचा अर्थ तुमची तब्येत ठीक नाही . आता विश्रांती सह राजकीय संन्यास घ्यावा. पक्षाने तुमच्या जड बुद्धीला विश्रांतीचा सल्ला दिलाय,” असा खोचक वार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


