🕒 1 min read
मुंबई : करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून अनेक क्षेत्रांसह क्रीडा क्षेत्रालाही प्रचंड फटका बसला होता. आता यातून बाहेर पडत असताना विविध स्पर्धा सुरू झाल्या असल्या तरीही आता त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या बायोबबल सुरक्षा व विलगीकरणाच्या नियमांना आता खेळाडू कंटाळले आहेत. स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे का नाही असा प्रश्न ते विचारत असून ही सुरक्षा व विलगीकरण आता नको रे बाबा अशीच मते विविध क्रीडापटूंनी व्यक्त केली आहेत.
जैव-सुरक्षित वातावरणात राहताना विलगीकरणाच्या कठोर नियमांचे पालन करणे अवघड असून यामुळेच थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान माझ्या मानसिकतेवर परिणाम झाला, अशी कबुली भारताचा पुरुष एकेरीतील अनुभवी बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने शुक्रवारी दिली.
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वप्रकारच्या स्पर्धासाठी जैव-सुरक्षित वातावरणात राहणे खेळाडूंना अनिवार्य असून त्यांना विलगीकरणाच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. परंतु यामुळे हळूहळू खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत असून त्यांची कामगिरीही खालावत चालली आहे, असे मत २८ वर्षीय प्रणॉयने एका ऑनलाइन सवांदादरम्यान व्यक्त केले.


