औरंगाबाद : १५ फेब्रुवारीपासून शहरात रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. दररोज हजार ते दिड हजार कोरोना रुग्ण निघत होते. आता मागील पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या घटू लागली आहे. सोमवारी जिल्ह्यात ६५५ रुग्ण निघाले. यात मनपा हद्दीत केवळ २१४ रुग्णांची भर पडली आहे. तसेच मनपाच्या ताज्या अहवालानुसार कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट ७.२२ पर्यंत कमी झाला असून रिकव्हरी रेटही ९६.०२ टक्क्यांवर आल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना आटोक्यात ठेवण्याकडे शहराची वाटचाल सुरू असली तरीही आता खरी सावध राहण्याची गरज आहे.
फेब्रुवारीत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अचानक उसळी मारली. दररोज हजार ते बाराशे रुग्ण आढळून येण्याला एप्रिलच्या शेवटच्या आठवडयात ब्रेक लागला. मे महिन्यात तर रुग्णसंख्या अधिकच घटल्याने महापालिकेने दहा कोविड केअर सेंटर्स तूर्तास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात गरज पडल्यास ते पुन्हा सुरू केले जातील. लॉकडाऊन, लसीकरण, कडक निर्बंधांचे पालन यामुळे कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात यश आल्याची माहिती सोमवारी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.
तिसऱ्या लाटेत १० ते २० टक्के संक्रमण अधिक: सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येऊ शकते. आणि यात या विषाणूची ताकद वाढल्याने संक्रमणाचा धोका १० ते २० टक्के जास्त असणार आहे. १८ पेक्षा कमी वयोगटातील मुलांना लवकर लागण होण्याचा धोका तिसऱ्या लाटेत अधिक असणार आहे. सोबतच मधुमेह रुग्ण, स्टेरॉईडचा अतिवापर झालेले रुग्ण यांना म्युकोरमायकोसिसचा धोका जास्त आहे. कोरोनापेक्षाही म्युकोरमायकोसिस अधिक धोकादायक असल्याची माहिती कोविड विभाग प्रमुख डॉ. शरद भरत बिरादार यांनी दिली.
त्रिसूत्रीचा वापर करु, तिसऱ्या लाटेला हरवू : सप्टेंबर शेवट तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. बाहेरच्या देशात जेव्हा दुसरी लाट आली त्याच्या अडीच महिन्यानंतर आपल्याकडे आली. सध्या १८ ते ४४ लसीकरण सुरु आहे. ४५ च्या पुढील नागरिकांचेही लसीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र १८ च्या आतील मुलांचे लसीकरण न झाल्याने तिसऱ्या लाटेत हा वर्ग जास्त संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे त्रिसूत्री मास्कचा वापर, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग यांचा वापर करुनच आपण तिसऱ्या लाटेला थोपवू शकतो. अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाच्या स्लॉटबाबत महापौरांची महत्वाची माहिती
- जायकवाडी धरण उशाशी असूनही, पैठणवासीयांच्या घशाला कोरड!
- इतर शहरांनी मुंबई, पुण्याकडून शिकण्याची गरज ; मोदी सरकारने केले कौतुक
- कॅबिनेट बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास, आम्ही लढण्यास सज्ज- साष्टपिंपळगाव आंदोलक
- राज्यात कोरोनामुक्तांच्या संख्येत मोठी वाढ, तर नवे कोरोना रुग्णही वाढले !


