🕒 1 min read
नाशिक : नाशिक येथे आंतरधर्मिय लग्नाचा सोहळा नुकताच काही धार्मिक संस्था-संघटना यांनी थांबविला आहे. याबाबत संबधित व्यक्तीवर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचा आधार घेऊन गुन्हे दाखल करावे, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जात पंचायत मूठमाती अभियानाने केली आहे.
देशातील सामाजिक विषमता संपुष्टात आणण्यासाठी समाजात जाणिवपूर्वक आंतरधर्मिय/ आंतरजातीय विवाह घडवून आणले पाहिजेत, हा एक प्रमुख व प्रभावी उपाय आहे, असे आपल्या देशाच्या राज्य घटनेला अभिप्रेत आहे.समाजसुधारकांनी त्यासाठी आयुष्य झिजवले आहे.
महाराष्ट्र शासनाने अशा विवाहांना समर्थन दिले असून त्यासाठी आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी तरतूद केली आहे. आंतरधर्मिय -आंतरजातीय विवाह घडवून यावेत ,त्यांना सामाजिक संरक्षण मिळावे यासाठी तज्ज्ञांची राज्य स्तरीय समिती नियुक्त केलेली आहे. तरीही, नाशिक येथे हिंदु – मुस्लीम आंतरधर्मिय विवाहाची चर्चा रंगवून,अफवा पसरवून, दोन समूहातील लोकांच्या मनात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही मूलतत्त्ववादी मंडळी करताना दिसतात. अशा विचारांच्या काही व्यक्ती व संस्था-संघटना यांनी दबाब आणून,पालकांनी ठरवल्याप्रमाणे लग्न विधी करण्यात खोडा घालून, सदर विवाह थांबविल्याचे कळते.
खरं तर नोंदनी पद्धतीने सदर विवाह झाला असल्याने त्यात जाती, धर्माच्या नावाने अडथळा आणणारे, त्याबाबतच्या प्रचलित कायद्याची पायमल्ली करीत आहेत. मुलीच्या आईवडिलांच्या जातीची संघटना म्हणजेच जातपंचायत सदर जातीत सक्रिय झाली असून, त्यांनी हा लग्न विधी न करण्याचे मुलीच्या वडीलांकडून लिहून घेतले आहे. त्यामुळे ह्या समाजात जातपंचाचे कामकाज छुप्या पद्धतीने चालू असल्याचे दिसून येत आहे.
तसेच या लग्नविधीचे पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितावर सामाजिक बहिष्कार टाकला जाणार असल्याची धमकी दिल्याचीही चर्चा आहे.असे जर असेल तर , हे कृत्य सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची तसेच नोंदनी पद्धतीने विवाहाला मान्यता असलेल्या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याने व संबंधित अन्य प्रचलित कायद्यान्वये दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते . टी.आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे व महेंद्र दातरंगे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात सोयाबीन पिकाची ९९ टक्के तर कापसाची ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी
- महाराष्ट्राला धोका कायम ; राज्यात अनलॉक नाहीच !
- शुभमंगल सावधान! लग्नाला ५० पेक्षा जास्त लोक, वधूपित्याला हजारोंचा दंड
- मोदींपुढे शरद पवार हेच सक्षम पर्याय ठरू शकतात, संजय राऊतांचे मोठे विधान
- औरंगाबादेत आता गरिब घरातील मुलेही सीबीएसई माध्यमातून शिकू शकतील, मनपाचा स्तुत्य पुढाकार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
