मुंबई : मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर देशभरातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद आणि हावडा तसेच उत्तर प्रदेशातील सहारनपूर, लखनौ आणि प्रयागराज येथे निदर्शने सुरू आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
“म.पैगंबरांचा अपमान करून देशात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा प्रकरणात चुप्पी साधलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा”, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणावरील टीव्ही चर्चेदरम्यान नूपुर यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला. २७ मे रोजी झालेल्या चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्या या नात्याने नुपूर यांनी आरोप केला होता की, काही लोक सातत्याने हिंदू धर्माची खिल्ली उडवत आहेत. असे असेल तर त्या देखील इतर धर्मांचीही खिल्ली उडवू शकतात. यावेळी नूपुर यांनी कुराणचा संदर्भ देत मोहम्मद पैगंबर यांच्यावर टिप्पणी केली. ज्यावरून वाद सुरू झाला.
नुपूर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, 5 जून रोजी भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले. सर्व पक्षीय पदांवरून काढून टाकले. दरम्यान नुपूर यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी नुपूरला मिळणाऱ्या धमक्यांवरही गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनीही त्यांना सुरक्षा पुरवली आहे.
महत्वाच्या बातम्या :


