परळी : निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मी परळीत आलो, आपणाला आवाहन केले, धनंजय मुंडे आमदार होत नाहीत तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा प्रण मी केला, माझ्या या आवाहनाला आपण भरभरून प्रतिसाद देत मला पुन्हा एकदा फेटा बांधण्याचा बहुमान दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धनंजय मुंडे यांच्या रूपाने एक कर्तबगार मंत्री आपण निवडून दिलात, त्यांच्या कर्तबगारीवर आम्हाला अभिमान आहे. अस खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने परळीत आल्यावर खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे निवडून आल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा प्रण केला होता. ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या निमित्ताने आज हा प्रण पूर्ण झाला आहे.
‘गेल्या चार महिन्यांहुन अधिक काळ खा. अमोल कोल्हे यांनी फेटा बांधला नव्हता, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्या अभिनयातून देशाच्या घराघरात पोचवलेल्या खा. अमोल कोल्हे यांना फेटा शोभून दिसतो; आज फेटा बांधताना मित्र कसा असावा ह्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमोल कोल्हे होय, मी आपणा सर्वांच्या साक्षीने सांगतो. त्यांना फेटा बांधून त्यांचा प्रण आज पूर्ण केला व त्यांचे व मला निवडून दिलेल्या तमाम परळीकरांचे आभार मानतो’ अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना मुंडेंनी मागील दोन कार्यक्रमात जनतेशी संवाद साधण्याची संधी हुकल्याचे सांगत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुन्हा एकदा आठवण करत परळीकरांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह, येत्या दोन वर्षांच्या आत १००% प्रदूषण व धुळी पासून मुक्ती हे आपले ध्येय असल्याचेही मुंडे म्हणाले. तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पात परळीतील तीर्थक्षेत्र विकासासह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी भरीव आर्थिक तरतूद आपण मिळवणार असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

