औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने उपलब्ध बेडची सुविधा कमी पडत आहे. त्यामुळे प्रत्येक रूग्णास उपचार देण्यासाठी महापालिकेने मंगल कार्यालये देखील ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मंगल कार्यालयांतील सुविधांसाठी पालिका जिल्हा प्रशासनाकडे तब्बल १५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणार आहे. पालिकेचे कोविड केअर सेंटर्स व शहरातील मंगल कार्यालये असे मिळून कोरोना रूग्णांसाठी सहा हजार बेडस् तयार करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
मागील दोन दिवसांत तर रोजचे हजारपेक्षा अधिक रूग्ण निघाले आहेत. त्यामुळे उपलब्ध बेडस् रूग्णांसाठी अपुरे पडत आहे. त्यामुळे पालिकेने कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी मंगळवारी पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या उपस्थितीत प्रभाग अभियंत्यांची बैठक झाली.
याबद्दल पानझडे यांनी माहिती देताना सांगितले की, प्रभाग अभियंत्यांना त्यांच्या त्यांच्या प्रभागांमधील मंगल कार्यालयांची माहिती जमा करण्यास सांगितले आहे. त्या त्या प्रभाग कार्यालयाच्या क्षेत्रात असलेल्या मंगल कार्यालयांमधील सुविधांचा अहवाल मागवला आहे.
मंगल कार्यालयांमध्ये दिवाबत्तीची सोय, पंखे, पाण्याची व्यवस्था, किती खोल्या आहेत, हॉल किती आहेत, टॉयलेट – बाथरुमची व्यवस्था कशी आहे, याची माहिती दोन दिवसात सादर करण्याचे आदेश प्रभाग अभियंत्यांना दिले आहेत. मंगल कार्यालयांमध्ये खोल्या तुलनेने कमी असतात, हॉल मोठे असतात, त्यामुळे रुग्णांची व्यवस्था हॉलमध्ये देखील बेड टाकून केली जाऊ शकते, त्या दृष्टीने देखील मंगल कार्यालयांची पाहणी केली जाणार असल्याचे पानझडे यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- शहरात बुरखाधारी महिलांची टोळी सक्रिय
- फडणवीस थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेणार; वाझे-हिरेन प्रकरणी नवा दावा करणार ?
- सान्या मल्होत्राच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज
- विनामास्क आईस्क्रीम विक्रेत्याला जिल्हाधिकाऱ्यांनी लावला दंड
- जळगाव मनपा महापौर-उपमहापौर निवडणूक ऑनलाईनच होणार


