🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार सध्या जोरदार चर्चेत आहे. अक्षयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत घेतल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका देखील केली आहे. अक्षय कुमारच्या परदेशी नागरिकत्वावरून त्याला ट्रोल केले जात आहे. अक्षयने देखील ट्विटकरत टीकाकारांना उत्तर दिले आहे.
अक्षय कुमारने ट्विटकरत आपल्या परदेशी नागरिकत्वावर केली जाणारी चर्चा निरर्थक असल्याचे म्हंटले आहे. कॅनडाचा पासपोर्ट माझ्याकडे असल्याचे कधीही नाकारलेले नाही, मागील सात वर्षापासून आपण कॅनडाला गेलेलो देखील नाही. तरीही माझ्या नागरिकत्वावर निरर्थक चर्चा केली जात आहे. या सर्व गोष्ठी अराजकीय आणि व्यक्तिगत असल्याने दुसऱ्यांच्या यामध्ये संबंध नाही. असे अक्षय कुमारने म्हंटले आहे.
मी भारतात राहतो आणि सर्व टॅक्स भरतो, आजवर मला कधीही भारतावरील प्रेम दुसऱ्याला दाखवायची गरज पडली नाही. याच्यापुढे देखील मेक इन इंडियाला अधिक सक्षम करण्यासाठी हातभार लावणार असल्याचं, अक्षयने ट्विटमध्ये सांगितले आहे.
— Akshay Kumar (@akshaykumar) May 3, 2019
ट्रोल करणाऱ्या मंडळींसाठी अक्षय कुमारच्या सामाजिक कामांची छोटीशी यादी
नवी दिल्लीत एका कार्यक्रमामध्ये त्यानं शहिदांच्या कुटुंबीयांना नुकतीच 13 कोटींची मदत केली. अक्षय ‘भारत के वीर’ हे देशभक्तीपर गीत लॉन्च करण्यासाठी गेला होता तेव्हा त्याने शहीद जवानांच्या परिजनांसाठी तब्बल 12.93 कोटी रूपयांची मदत केली. तसेच आसाममध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जवान नरपत सिंह हे शहीद झाले. त्यानंतर अक्षयनं त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना 9 लाखांची मदत केली.
शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी अक्षय कुमारच्या संकल्पनेतून नवं अॅप तयार करण्यात आलं आहे. ‘भारत के वीर’ असं या वेब पोर्टलचं नाव असून या पोर्टलच्या माध्यमातून इच्छूकांना शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता येणार आहे. या पोर्टलसाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबियांना ही मदत पोहचवण्यात येत आहे.
छत्तीसगडच्या सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या 12 जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारने 1 कोटी 8 लाख रुपये मदत केली आहे.या हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले होते.
मुंबईतील नायगाव येथे त्याने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्याधुनिक सुविधा असलेलं रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.पोलिस आणि त्यांच्या कुटुंबांना उपचाराच्या काळात राहण्यासाठी चांगली सुविधा मिळेल. पोलिस देशासाठी मोठं योगदान देतात. आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा हाच खरा मार्ग असल्याचं अक्षयचं मत आहे.
यवतमाळमधील पिंपरी बुटी गाव दत्तक घेत त्याने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला असून गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अक्षय कुमारनं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. ज्या गावांमध्ये शेतकरी आत्महत्यांच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत, ते गाव अक्षय दत्तक घेण्याची इच्छाही त्यानं व्यक्त केली होती. त्यानुसार राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सर्वाधिक आत्महत्या झालेलं गाव सुचवण्यास सांगितलं होतं.
अक्षयकुमारने चेन्नई पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला . पूरग्रस्तांसाठी अक्षयकुमारने एक कोटी रुपयांची मदत दिली आहे.एका ट्रस्टतर्फे चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. ट्रस्टचे प्रमुख, निर्माते जयेंद्र यांच्याकडे अक्षयने मदतीचा चेक सुपूर्द केला.
याशिवाय बीडमधल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजाराची मदत केली प्रत्येक महिन्याला 15 लाख याप्रमाणे 6 महिन्यात एकूण 90 लाखांची मदत केली .
अक्षयच्या कामाची यादी खूप मोठी आहे. महिला,कष्टकरी,शेतकरी, जवान, पोलीस यांच्या वेदना त्याने जाणून घेतल्या व सढळ हाताने मदत देखील केली. असंख्य कलाकार, गब्बर झालेले उद्योजक ,अतिश्रीमंत नेते, कोट्यावधी रुपयांचं मानधन घेणारे क्रिकेटपटू असणाऱ्या या देशात अक्षयसारखा संवेदनशील व्यक्ती सापडणे दुर्लभच.तो भारताचा नागरिक आहे की नाही, त्याने किती कोटी रुपये दान दिले यापेक्षा त्याच्याकडे देण्याची दानत आहे हे ध्यानात घेणे आवश्यक आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

