🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे.
‘जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची विक्री झाली आहे. कारखाना व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळं कारखान्याचं संचालक मंडळ ईडीच्या कारवाईला न्यायालयात आव्हान देईल,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
काय आहे आरोप?
जरंडेश्वर साखर कारखाना हा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. जरंडेश्वर कारखान्यानं बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याच्या तपासातून समोर आलं आहे. त्या आधारेच ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरूपाचा होता. मात्र नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं. अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून कारखाना बळकावल्याचा आरोप केला जात आहे.
अजित पवारांचे स्पष्टीकरण
सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. 2016 आणि 2017 मध्ये सर्व रितसर परवानग्या घेतल्या होत्या. माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जातील, असं अजित पवार म्हणाले.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या आवाहनानंतर पद सोडले
ईडीकडून गुरू कमॉडिटीसंदर्भात काही चौकशा सुरू आहेत, त्यामुळे त्यांनी या कारखान्याची माहिती घेतली. मात्र, सध्या हा कारखाना जरंडेश्वरद्वारे चालविला जात आहे. गुरू कमोडिटीचे मुंबईतील ओंकार असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांच्या कंपनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. आम्हाला पण प्रपंच, परिवार आहे. जरंडेश्वरच्या डायरेक्टरने ईडीच्या ऑफिसरला सर्वकाही दाखवलं आहे. नियमाच्या आधीन राहूनच या कंपनीला कर्जवाटप करण्यात आलं आहे. आम्ही यापूर्वी काही कंपन्यांवर डायरेक्टर होतो, पण डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी देशातील सर्वच मंत्र्यांना एखाद्या कंपनीच्या डायरेक्टरपदी न राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी, आम्ही ते पद सोडून दिले, असेही अजित पवार यांनी सांगितलं.
जरंडेश्वर न्याय मागण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे जाईल
ईडीकडून गुरु कमोडिटीच्या संदर्भात काहीतरी चौकशी सुरु आहे. ती सुरु असताना कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असल्याने टाच आणली आहे. कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असला तरी जरंडेश्वर शुगर मिल चालवत आहे. कंपनीशी माझा काही संबंध नसल्याने मी माहिती घेतलेली नाही. पण कारवाई झाली असल्याची गोष्ट खरी आहे. ईडीला चौकशीचा अधिकार आहे. मागे इतर अनेक संस्थानीं चौकशी केल्या असून त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. जरंडेश्वर न्याय मागण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे जाईल. अनेक शेतकरी आणि आणि कामगारांच काम त्या कारखान्यावर अवलंबून आहे, असे पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सर्व काही नियमांनुसारच!’, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उत्तर
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
