मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीसह जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवर कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडत असल्याचं दिसून येत आहे. कोट्यवधींच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर देखील गंभीर आरोप केले आहेत.
शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा रविंद्र वायकर आणि रश्मी उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी काल मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन केला होता. अलिबागमधील कोर्लाई येथे वायकर व ठाकरे यांनी संयुक्तपणे खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुंबईत महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात रविंद्र वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवा यांच्याकडून २५ कोटींचा मोबदला मिळाल्याचा आरोप देखील सोमय्यांनी केला आहे. दरम्यान, आता शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत सोमय्यांना थेट मानहानीची नोटीस पाठवली आहे.
‘अलिबागमधील कोर्लाई व मुंबईतील महाकाली येथील जागेबाबत बिनबुडाचे आरोप करून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माझी, माझ्या कुटुंबांची व शिवसेना पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे,’ असे या नोटिशीत नमूद केले असून ‘सोमय्या यांनी या दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा देखील वायकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी वकिलांमार्फत सोमय्यांना मानहानीची नोटीस त्यांनी पाठवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना वाढतोय पण निर्लज्जपणे थुंकणाऱ्यांना आवर घालणार कोण ?
- सचिन वाझेंचे पाय खोलात; अंतरिम जामीन न्यायालयाने नाकारला
- २ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय; वीजबिल वसुलीवरून राजू शेट्टी भडकले
- भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणासोबतही जाणार-खा.जलील
- ‘काही मंत्री मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत आहेत’, मेटेंचा गंभीर आरोप


