कोल्हापूर : सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात १९ मार्च रोजी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. ‘२ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय, राज्य सरकारकडून अचानक वीजबिल सक्ती केली जातेय. मात्र सर्वसामान्यांनी पैसे कुठून आणायचे?,’ असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे.
कोल्हापुरात सक्तीच्या वीज वसुली विरोधात सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. वीज बिल वसुलीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ‘राज्य सरकार अशी अचानक सक्ती करुच कसं शकतं? यामुळे दोन मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्य जनतेचा जीव जातोय. अशी अचानक सक्ती केली जातेय तर पैसे आणायचे कुठून? त्यामुळे ग्राहकांना वीज बिल भरायला एक महिन्याचा वेळ द्यायला हवा,’ अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
लॉकडाऊन काळातील वीजबिल सरकारने माफ करावे ही मागणी आमची आजही ठाम आहे. ‘१९ मार्चला महाराष्ट्रात पाहिल्यांदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे त्याच दिवशी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.’ अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. तर, ‘१९ मार्चच्या या आंदोलनात सर्वसामान्य जनतेचा रोष दिसेल. सर्वसामान्यांमध्ये बीजबिलावरुन राज्य सरकारवर नाराजी आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी,’ असंही राजू शेट्टी म्हणाले.
पुढे त्यांनी शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे अशी मागणी देखील केली आहे. ‘राज्यातील शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही. तर, एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही. लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचं घरगुती वीजबिल माफ करावं, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रातील १ कोटी ३५ लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे,’ असं भाष्य करत त्यांनी राज्य सरकारला इशाराच दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कानड्यांची मुजोरी सुरूच ! मराठी बोर्डांना फासलं काळं
- ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री मंगळवारी संबोधित करणार’
- महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला; कोल्हापुरात महाराष्ट्र शासनाच्या बसवर दगडफेक
- महात्मा फुलेंच्या जीवनावर येणार चित्रपट; अजय-अतुल यांचे संगीत
- शहरातून पुन्हा तीन दुचाकी लांबवल्या


