– ओमकार गायकवाड
आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि मी आदित्य ठाकरे यांची तुलाना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत का केली असेल? तर सध्याच राजकीय वातावरण पाहता आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं कि अमिताभ बच्चन यांच्या जब जब मे बिखरा हु, दुगनी रफ्तार से निखरा हू या वाक्याची आठवण येते. कारण आदित्य ठाकरेंचा सध्याचा लोकप्रियतेचा वेग पाहता त्यांना हे तंतोतंत लागू होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० असे ५० आमदार घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. यानंतर पुढे शिंदे यांनी भाजप सोबत हातमिळवणी करत राज्यात युतीच सरकार स्थापन केलं. शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र हा सर्व सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना पक्षाचे दोन गटात विभाजन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला.
या घटनेनंतर लगेच काही दिवसात शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले. हा ठाकरेंना दुसरा मोठा धक्का होता. त्यानंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक, जिल्हा प्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले. दिवसेंदिवस शिंदे गटाची ताकद वाढण्यास सुरवात झाली. पण या सर्व घटना घडल्यानंतर शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा पक्षाची मोट बांधण्यासाठी मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर निष्ठा यात्रा काढण्यास सुरवात केली आहे.
जे जे आमदार बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे जाहीर सभा घेऊ लागले. याच सभांच्या गर्दीतून शिवसेनेबद्दल लोकांचा प्रतिसाद लक्षात येऊ लागला. आदित्य ठाकरे हे राज्यभर अविश्रांत दौरे करत आहेत. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी आणि प्रतिसाद मिळत आहे. जिथे जिथे त्यांच्या सभा होत आहेत. तिथे तिथे लोकांचा एक वेगळाच उत्साह दिसतोय.
राज्यात आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूका येऊ घातल्यात. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र आदित्य ठाकरेंच्या वाढत्या वेगामुळे भाजप आणि शिंदे गटास ते जड जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. आदित्य ठाकरेंना असाच प्रतिसाद मिळत राहिला तर ते महाराष्ट्राचे भावी जगनमोहन रेड्डी म्हणून उदयास येऊ शकतात. जगनमोहन रेड्डी यांनी ज्या पद्धतीने वडिलांच्या मुत्यूनंतर संघर्ष करत आपला स्वतःचा एक वेगळा पक्ष स्थापन करून आंध्रप्रदेशमध्ये एकहाती सरकार स्थापन केलं.
जगनमोहन रेड्डी यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेसकडून अपमान आणि बेहिशेबी संपत्तीप्रकरणी तुरुंगवास यासह अनेक चढउतार पाहणाऱ्या जगनमोहन रेड्डींनी अखेर मोठं यश मिळवलं. एक छोटा उद्योगपती ते शक्तीशाली नेता हा प्रवास करताना जगनमोहन रेड्डींना विविध प्रसंगांना सामोरं जावं लागलं. पण अखेर ज्या पक्षाने त्यांचा अपमान केला, त्या पक्षाचा राज्यातून सुपडासाफ करण्यात त्यांनी यश मिळवलंय. सुरवातीला आंध्रप्रदेशामध्ये 2014 मध्ये टीडीपीकडून वायएसआर काँग्रेसचा दारुण पराभव झाला.
पण यानंतर राजकीय गणित समजण्यासाठी रेड्डी यांनी 341 दिवसांची पदयात्रा काढली. पराभवाची कारणं समजणे आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी राज्यभर पायी फिरले. राज्यातील 134 विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी जवळपास दोन कोटी लोकांशी संवाद साधला. या यात्रेतूनच वायएसआर काँग्रेसने लोकांमध्ये जनसंपर्क प्रस्थापित केला आणि त्याची पावती त्यांना २०१९ च्या निवडणुकीत मिळाली. 175 जागा असलेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआरने तब्बल 151 जागा मिळवल्या. यानंतर रेड्डी हे देशातील पावरफुल नेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले. जगनमोहन रेड्डी यांच्यातील याच संघर्षाच्या गोष्टी आता आदित्य ठाकरे यांच्यात दिसू लागल्यात. आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा आणि महाराष्ट्र दौरा किती सफल होतोय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज्यातील इतर पक्षांचा विचार केला असता एक युवानेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे विरोधी पक्षांसह मित्रपक्षांवर देखील भारी पडत आहेत. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. बाकी पक्षातील युवा नेत्यांच्या तुलनेत आदित्य ठाकरे हे केव्हाही सरस ठरतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, माजी मंत्री अदिती तटकरे काँग्रेसचे युवा आमदार प्रणिती शिंदे, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख पुढे भाजपचे, राम सातपुते, रोहिणी खडसे, श्वेता महाले, निलेश राणे, नितेश राणे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार योगेश कदम मनसेचे अमित ठाकरे या सर्व नेत्यांचा विचार केला असता आदित्य ठाकरे यांची लोकप्रियता महाराष्ट्रभर प्रचंड वेगाने वाढत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यामध्ये कात्रज चौक भागात शिवसैनिकांनी हल्ला करत गाडीची तोडफोड केली होती. कात्रज चौकात उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच फोडली. यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. हे सर्व प्रकरण घडलं त्यावेळी आदित्य ठाकरे यांची सभा कात्रज येथे होणार होती. सावंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर सामान्य शिवसैनिकांमधील शिंदे गटाबद्दलचा असंतोष जाहीर झाला होता.
तर पुढे काल २७ ऑगस्टला मंत्री संदीपान भुमरे यांचा कॅबिनेटमध्ये समावेश झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघामध्ये कार्यक्रमसाठी आले होते. यावेळी रक्तदानाचा शिबिर देखील आयोजित करण्यात आल होत. आपल्या मतदारसंघातील आमदाराला मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांचे उत्सुकता अपेक्षित होती. मात्र हजार लोकांची गर्दीची अपेक्षा असताना केवळ शंभर ते दीडशे लोक उपस्थित राहिले होते. मात्र तेव्हा गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पैठणमधल्या आदित्य ठाकरे यांच्या सभेची आठवण झाली. निष्ठा यात्रेनिमित्ताने आदित्य ठाकरे पैठणमध्ये आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी जमली होती. यावरून असं लक्षात येतंय कि, सामान्य जनता शिंदे गटाकडे पाठ फिरवत आहे.
यानंतर आता आदित्य ठाकरे या बिकट परिस्थितीत खरे उतरतील का? आपल्या पक्षाची मोट पुन्हा नव्याने बांधतील का? शिवसेनेचा इतिहास पहिला तर जे सेना सोडून गेले ते पुन्हा निवडून आले नाहीत. हे पाहत शिवसेना पुन्हा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल का? शिंदे गटाचं काय होणार? असे अनेक प्रश्न समोर आहेत. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल…!
महत्वाच्या बातम्याः
- Sushma Andhare |”याचं दार, त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार…”, नवनीत राणा यांच्यावर सुषमा अंधारे बरसल्या
- Alia Bhatt | बाॅयकाॅट ब्रह्मास्त्र दरम्यान आलिया भट्ट हिला दिलासा, ‘हा’ हॅशटॅग ट्रेंडींग
- Ravi Rana vs Bacchu Kadu | रवि राणा आणि बच्चू कडू यांचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
- IND vs PAK: “जेव्हा काँग्रेस आणि भाजपचे नेते एकत्र…” ; भारत-पाक सामन्यापूर्वी प्रियांका गांधींनी सांगितली जुनी गोष्ट
- Shahajibapu Patil | “जे खोके घ्यायचे, तेच आता बडबडताय…”, शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना गटावर साधला निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

