वाडा : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह महाराष्ट्रात विविध उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांची दमछाक होत आहे. अख्ख्या जगातील संशोधक, तज्ज्ञ मंडळी कोरोनावर संशोधन करत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व भीषण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सध्या राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काही लोक नियम पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करत आहेत, याचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. वाडा तालुक्यातील खरीवली मध्ये ‘अनच्याव्यू रिसॉर्ट’वर दिनांक २९ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी वाडा आणि तहसिलदार वाडा यांना माहिती मिळाल्यानंतर अचानकच धाड टाकण्यात आली.
धाड टाकली असता सदर ठिकाणी जवळपास १०० जण लग्न समारंभ करण्यासाठी एकत्र आले होते. सदर लग्नास सक्षम अधिकारी यांची परवानगी घेतली नसल्याने महाराष्ट्र शासनाने लग्न कार्यासाठी घालून दिलेल्या निर्बंधाचा भंग केल्याने वर पिता, वधू पिता आणि केटरर्स यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमांचा भंग केल्याने ५० हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला असून, सदरचे रिसॉर्ट सिल करण्याची कारवाईही करण्यात आली आहे.
दरम्यान, काल १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची जाहीर घोषणा करण्यात आली आहे. १ मे सकाळी ७ वाजल्यापासून ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तसेच, सर्व कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले असून अतिमहत्वाच्या कारणाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तर लॉकडाऊन काळात लागू करण्यात आलेले निर्बंध कठोरपणे पाळण्यात यावेत अशा सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. हे सर्व जनतेच्या आरोग्यरक्षणासाठीच करण्यात येत असल्याने जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ससमोर आरसीबीचे तगडे आव्हान
- पृथ्वी शॉच्या तडाख्यानंतर दिल्लीचा केकेआरवर ७ गडी राखुन दणदणीत विजय
- मुंबईत लसींचा तुटवडा, आजपासून पुढचे तीन दिवस लसीकरण बंद !
- कोरोनाची तिसरी लाट येईल,आताच नियोजन करा ; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- पोलीसांनी लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करा;आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

