टीम महाराष्ट्र देशा : कोरोना लागणीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यावर हातावर पोट असलेल्यांसाठी शिधा पत्रिकेवरील धान्य हाच एकमेव आधार राहिला आहे. अश्या स्थितीत राज्यात जे नियमित रेशन मिळते त्याचे वाटप एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाले. आज पंतप्रधानांनी सुद्धा पुणे जिल्ह्यातील सरपंचाशी संवाद केला व सर्व लाभ जनतेपर्यंत पोहचत आहेत असे सांगितले. परंतु या रेशन पुरवठा यंत्रणेतील अनेक भ्रष्टाचार पुढे येत आहेत. त्याच बरोबर मोफत मिळावयाचे धान्य अजूनही बरेच ठिकाणी मिळालेले नाही.
जनतेच्या हा प्रश्नाला आज आवाज नाही कारण ही जनता आज रस्त्यावर येऊ शकत नाही . म्हणून आम आदमी पार्टीने जनतेला रेशन बाबत मदत करण्याचे ठरवले आहे . पुणे शहरापासून अगदी जवळ , पिरंगुटच्या आय टी औद्योगिक भागातील भोईर वाडी गावातील मोठ्या भ्रष्टाचाराचा प्रकार आम आदमी पार्टीने उघडकीस आणला असून त्या बाबतची तक्रार छगन भुजबळ , अन्न व पुरवठा मंत्री भुजबळ यांचेकडे तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
या गावातल्या ८ सदस्य असलेले साठे कुटुंबीय यांना 35 किलो धान्य अपेक्षित असताना ८ ते १२ किलो धान्य मिळते .तर बायडाबाई कडे ७ सदस्य असून त्यानाही १० किलो तांदूळ दिला आहे, गहू मिळालाच नाही. या गावातील या दुकानात १२८ पात्र कुटुंबे असून ५६४ सदस्य आहेत. यातील भ्रष्टाचार प्रमाण बघून कुणाचेही डोळे फिरतील अशी स्थिती आहे. नमुना पाहणीतील १२ कुटुंबाना १५३ किलो गहू , १०२ किलो तांदूळ वाटप केले अशी दुकानदाराची नोंद आहे आणि प्रत्यक्षात फक्त ८९ किलो तांदूळ वाटप केले आहे. ६१२ रुपयाच्या नोंदीत २६७ रुपयाची प्रत्यक्ष विक्री म्हणजे फक्त ४३ टक्के किमतीच्या धान्यमालाचे वाटप व इतर उर्वरित धान्याचा भ्रष्टाचार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे दुकानदाराने सर्व नोंदी स्वप्रमाणित केल्या आहेत .
या गावात बहुतेक सर्वाना त्यांना शिधा पत्रिकेनुसार पात्र असलेल्या धान्यापैकी फक्त तांदूळ विक्री झाली असून ती प्रत्यक्षात अपेक्षित लाभापेक्षा कमी आहे . परंतु दुकानदाराने केलेली नोंद ही कमाल लाभाची आहे म्हणजेच लाभार्थ्याने सर्व धान्याची उचल केली असल्याच्या खोट्या नोंदी आहेत. लाभार्थी पैकी कुणालाही एप्रिल महिन्याचा गहू मिळालेला नसून गहू वाटप केल्याच्या खोट्या नोंदी दुकानदाराने स्वतः आधार प्रमाणीकरण करून केलेल्या आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न मोफत योजने अंतर्गत तांदूळ, गहू , डाळ या पैकी कश्याचेच वाटप झालेले नाही.
सदरचा दुकानदार भ्रष्टाचार करत असून नागरिकाने भांडण केल्यास त्याच्या कोट्यातील धान्य देवून तोंड बंद ठेवायास सांगतो . तर कधी दमदाटी करतो . यातील अनेकांचे म्हणणे रेकोर्ड केलेले आहे . सदरचा दुकानदार कोणतीही पावती देत नाही पावती मागितल्यास मशीनला रेंज नसल्याचे सांगतो. लाभार्थींना दमदाटी , परत परत फेर्या मारावयास लावणे, रेशन आल्याचे न सांगणे अशी कृत्ये करतो.
कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार जनतेला दिलासा न देता उलट टाळूवरचे लोणी खाण्याचाच आहे .या प्रकरणाला वाचा फोडली गेली तर आणि कडक कारवाई झाली तरच इतर ठिकाणी सुद्धा जरब बसेल. या सर्व बाबींचा विचार करता तातडीने या दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा, बेजबाबदार दोषी पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तातडीने नियमित रेशनचे तसेच मोफत रेशनचे वाटप व्हावे व जरूर असल्यास स्थानिक बचत गट / संस्था यांचे सहाय्य घेऊन लॉकडाऊन काळात हे वाटप करावे अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

