🕒 1 min read
नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खरे तर भाजपचे मुख्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. त्यांची हायकमांड दिल्लीत आहे. शिवसेनेची हायकमांड मुंबईत आहे. महाराष्ट्रात आहे. मातोश्रीमध्ये आहे. शिवसेनेची हायकमांड दिल्लीत नाही. एकनाथ शिंदे यांचे प्रत्येक पुढचे पाऊल दिल्लीश्वराच्या आशीर्वादानेच पुढे जाताना दिसते. शिंदे गटातील 40 आमदार तन, मन, धनाने भाजपमध्ये विलीन झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेनेचा एकही मुख्यमंत्री दिल्लीला जात नाही. अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “बेईमान आमदार गेले तरी शिवसैनिक राहणार आहेत. या शिवसैनिकांमुळेच आमदार आणि खासदार होणार आहेत. धनुष्यबाण हा शिवसेनेचा पंचप्राण आहे. आधी ह्रद्यातला प्राण जाईल मग धनुष्यबाण जाईल. धनुष्य-बाण आपल्या हातात ठेवा. जर कुणी खेचायचा प्रयत्न केला तर कुठे घुसवायचाय हे आदेश योग्य वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देतील.”
आपले अस्तित्व वाचवण्यासाठी शिंदे गटाचे आमदार स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी शिवसेनेशी संबंध असल्याचे सांगितले नाही तर त्यांचे अस्तित्व संपेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या आणि उद्धव ठाकरे समर्थक उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवून द्या, असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा माफिया असा उल्लेख केला होता. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सोमय्या यांना ‘भाजपचे संजय राऊत’ संबोधत उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते असल्याचे म्हटले होते. शिंदे गटाच्या आमदारांनी स्वतःचा गट स्थापन केला असला तरी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्ये खपवून घेणार नाहीत, असे केसरकर म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना हे सर्व नाटक असल्याचे म्हटले आहे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी हे नाटक केले जात आहे. शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय ते अस्तित्वात राहू शकत नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक असल्याने शिंदे गट हे करत असल्याचे राऊत म्हणाले.
शिवसेनेचा विश्वासघात करणाऱ्या भाजपला एकनाथ शिंदे यांनी हायकमांड म्हणून स्वीकारले. भाजपने दिलेले आश्वासन पाळले असते तर एकनाथ शिंदे आधीच मुख्यमंत्री झाले असते, असे संजय राऊत म्हणाले. आज संपूर्ण देश आपल्यासोबत आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांची कारकीर्द संपली आहे. ते रस्त्यावर येतील. मुंबई तोडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करून केंद्रशासित प्रदेश करण्याचा विचार सरु आहे. मुंबई तोडण्यासाठीच दिल्लीने शिवसेनेला तोडली आहे. कारण त्यांच्या कामात शिवसेना सर्वात मोठा अडथळा आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
