🕒 1 min read
मुंबई: काल (१० मार्च)मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि पंजाब या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, १० मार्च नंतर राज्यातील मविआ सरकार पडेल. आता एकंदरीत निवडणूक निकाल आणि भाजपच्या भाकितावर शिवसेनेने उत्तर दिले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
निवडणूक कोणतीही असो त्या निवडणुकीत संपूर्ण साधनसंपत्ती , प्रचार यंत्रणा , पैसा अशा आयुधांचा वापर करून भाजप ताकदीने उतरत असतो. देशासमोर इतर प्रश्न कोणते आहेत याची फिकीर न करता पंतप्रधानांपासून गृहमंत्री व संपूर्ण केंद्रीय व राज्यांचे मंत्रिमंडळ झोकून देऊन मैदानात उतरत असते. पाचही राज्यांच्या प्रचार काळात याचा प्रत्यय आलाच. पंजाबातील निकाल डोळ्यात अंजन घालणारे आहेत. उत्तर प्रदेशातील जमिनीवर अखिलेश यादवांना हवेत तीर मारून चालणार नाही.अधिक गांभीर्याने त्यांना यापुढे निवडणूक लढवावी लागेल. प्रियंका गांधींनी आता कुठे लढाईला सुरुवात केली आहे. ती त्यांनी अर्धवट सोडू नये. पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? माकडांच्या हाती दारूची बाटली आल्यावर जे घडते तसेच काहीतरी होईल. पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण असते. भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत व निदान उत्तर प्रदेशात तरी ‘ऑपरेशन गंगा’ सफल झाले आहे. उत्तर प्रदेश , मणिपूर , गोवा , पंजाब आणि उत्तराखंड अशा पाच राज्यांतील निकालांनी भारतीय जनता पक्षाला उत्साहाचे भरते येणे साहजिक आहे. पंजाब वगळता इतर चार राज्यांत भाजपने सत्ता राखली आहे. संपूर्ण केंद्रीय सत्ता, देशभरातील भाजपचे बळ, प्रचंड धनसत्ता, हाताशी असलेली अमर्याद साधनसंपत्ती या बळावर भाजपला विजय मिळाला नसता तरच नवल होते. भाजपच्या विजयाचे विश्लेषण थोडक्यात करायचे तर जिथे भाजपला पर्याय होता, तिथे मतदारांनी भाजपला पराभूत केले. पंजाबातील ‘आप’चा मोठा विजय हे त्याचे उदाहरण. पंजाबात काँग्रेसचे राज्य होते, ते त्यांनी स्वतःच घालविले. पंजाबच्या जनतेला ‘आप’च्या रूपाने एक पर्याय मिळाला व सत्ताधारी काँग्रेससह भाजप , अकाली दलाचा दारुण पराभव तिथे झाला. पंजाबात मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी , नवज्योतसिंग सिद्धू , अकाली दलाचे बादल पिता-पुत्र , काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री कॅ . अमरिंदर असे सर्व दिग्गज पराभूत झाले आहेत. लोकांना पर्याय मिळतो तेव्हा ते बदल घडवितात. मणिपुरात भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळाली, पण बहुमताचा आकडा गाठता आला नाही व 60 आमदारांच्या जागेत भाजपने 32 जागा जिंकल्या. त्यामुळे इतर बरेच लोक निवडून आले त्यांना घेऊन भाजप सत्ता राखू शकेल. असा सल्लाही राऊत यांनी भाजपला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
