औरंगाबाद: गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक गावातील विदारक चित्र बदलण्याची गरज आहे, असे मत नभांगन फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी व्यक्त केले. त्या नभांगन फाऊंडेशनच्या पुढाकाराने ढोरकीन तांडा येथे बांधण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी गुरुवारी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून दीपप्रज्लन करण्यात आले. उत्तम सीताराम राठोड यांनी शाळेसाठी तीन गुंठे जमीन दिली, या राठोड दांपत्याचा सन्मान करण्यात आला. नभांगण फाऊंडेशनतर्फे दोन वर्ग, एक किचन आणि स्वच्छतागृह बांधून दिले जाणार आहेत. या शाळेच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना राजश्री देशपांडे यांनी सांगितले की, गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शाळेचं बांधकाम पूर्ण होणे अशक्य आहे. सगळेजण मिळून तांड्याचे रूप पालटू शकते. शाळा दयनीय अवस्थेत आहेत. आजच काम करण्याची आवश्कता आहे. बऱ्याच शाळा बंद आहे, तिथे गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. आपल्या मूलभूत बाबींसाठी मागणी करावी. अन्यथा गाव रिकामी होतील. विदारक चित्र बदलण्याची गरज आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, पुस्तके, स्वच्छतागृह, साहित्य यासाठी शासन आणि प्रशासन यांच्याकडे मागणी करावी. तरच गाव समृध्द होतील. दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी.
मुख्याध्यापिका अलका झरवाल म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास बांधील आहे. गावकरी उत्तम राठोड यांनी जागा दिल्यामुळे शाळेच्या इमारतीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर नभांगान फाउंडेशनच्या संस्थापिका राजश्री देशपांडे यांच्या पुढाकाराने शाळेची इमारत उभी राहणार आहे. येथून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन विद्यार्थी जगभरात आपला ठसा उमटवतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
डॉ. ओमप्रकाश रामावत म्हणाले की, सरकार शिवाय उद्योजक आणि व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन थोडी का होईना मदत करावी. आमच्या सगळ्यांकडून जी शक्य ते सर्व सहकार्य करू. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गाडेकर यांनी केले. आभार संतोष पवार यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, पंचायत समिती सभापती अशोक भवर, उप सभापती कृष्णा भूमरे, गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, श्रीराम केदार, नभांगण फाऊंडेशन च्या राजश्री देशपांडे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पुदाट, विनोद बोंबले, ढोरकिन सरपंच वैभव मुळे, पंचायत समिती सदस्य राजश्री बादाडे, केंद्रप्रमुख संतोष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या:
“गोरेगावमध्ये बदल करू शकले नाहीत…”- आशिष शेलारांचा शिवसेनेला चिमटा
नेमकं असं काय झालं की ; ‘मलायकाला’ मुला विषयी का वाटू लागलीय भीती..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

