🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने सर्व स्तराहून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच अजूनही या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर तसेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(Basavraj Bommai) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या विषयाकडे पोटतिडकीने पाहायला हवे. महाराष्ट्र सरकार तरी याप्रश्नी नक्की काय करते आहे? भारतीय जनता पक्षाने आपली विश्वासार्हता साफ गमावली आहे. ठाम अशी भूमिका नाहीच. कधी कशी टोपी फिरवतील याचा नेम नाही. एक तर त्यांच्या भूमिका राज्याराज्यानुसार बदलत असतात, पण न्याय-अन्यायाच्या व्याख्याही बदलत असतात. या ‘दहातोंडी’पणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बंगळुरूत झालेली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना. त्या विटंबनेनंतर कर्नाटक सरकारने सुरू केलेली दडपशाही हा धक्कादायक प्रकार आहे. प्रकरण शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे व विटंबनेचा धिक्कार करणाऱ्या मराठीजनांवरील अत्याचारांचे आहे. कर्नाटकात भाजपचे शासन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपवाले त्या दडपशाहीवर ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. हे सर्व प्रकरण अद्याप विझलेले नाही, तर त्यात तेल ओतण्याचे काम कर्नाटकचे बोम्मई सरकार करत आहे. १६ डिसेंबरला बंगळुरूत छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना अज्ञात समाजकंटकांनी केली. हे अज्ञात समाजकंटक म्हणजे कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे गावगुंड होते. त्या घटनेचे पडसाद उमटायचे ते उमटलेच. सीमा भागातील मराठी जनतेने शिवराय पुतळा विटंबनेचा रस्त्यावर येऊन निषेध केला. हा लोकांचा संताप आणि चिड होती.’
दरम्यान, बंगळुरू येथील शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कारवाई करावी याच मागणीसाठी ही मऱ्हाटी पोरे रस्त्यावर उतरली. तेव्हा त्यांना कानडी पोलिसांनी बेदम मारहाण करून तुरुंगात पाठवले. आजपर्यंत त्यांना जामीन तर मिळू दिलेला नाहीच, पण या ३८ पोरांवर आज राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायमचेच सडविण्याचा अघोरी प्रकार सुरू झाला आहे. या अतिरेकास काय म्हणायचे, ते महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच स्पष्ट करावे. शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध केला, हा काय देशद्रोहासारखा अपराध झाला? त्याच वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, शिवरायांचा अपमान ही किरकोळ बाब आहे. त्यासाठी अशी निषेधाची आंदोलने करणे बरे नाही. बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही सुंताच झाली असती व तुमचाही मियाँ बोम्मई खान बनला असता. शिवराय होते, जन्मले व मोगलांविरुद्ध लढले म्हणून तुमची ही आजची मिजास सुरू आहे’, असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारतातही नसीरुद्दीन सारख्या…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- बुमराहचा खतरनाक यॉर्कर! भारतीय गोलंदाजाचा व्हिडिओ व्हायरल
- “…अशी शैली माजी पंतप्रधानांमध्ये नव्हती”; शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक
- यूपी योद्धाने गुजरात जायंट्सशी साधली बरोबरी, सामना अनिर्णित
- पंतप्रधान मोदींबाबत शरद पवारांचे मोठे विधान म्हणाले, “यूपीए सरकारमध्ये दुसरा मंत्री नव्हता जो…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
