🕒 1 min read
औरंगाबाद : दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल 5 आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. दरम्यान पेट्रोल आणि डिझेल आणखी 7 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी कसे होतील यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काळात इंधनाचे दर आणखी सात रुपयांनी स्वस्त होणार आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यासाठी राज्यांना पत्र लिहिल्याची देखील माहिती कराड यांनी दिली आहे. भाजपाचे ज्या राज्यात सरकार आहे, तेथील सरकारनी पेट्रोलचे दर कमी केले आहेत. आता महाराष्ट्रातील पेट्रोल दर कमी करावेत यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्राने एक्साईज ड्युटी कमी केल्याने राज्यांचा व्हॅट कमी होतो, व्हॅट कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेल आपोआपच सात रुपयांनी स्वस्त होईल असे विधान कराड यांनी केले आहे. ते टीव्ही 9 शी बोलत होते.
दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ६.०७ रुपये आणि ११.७५ रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.९७ रुपये आणि डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०९.९८ आणि ९४.१४ रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. सरकारने अबकारी दरात कपात केली असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून जवळपास दररोज इंधनाचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- भाजपचा पूर्ण पराभव झाल्यास पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होणार; राऊतांचा दावा
- ‘एनडीआरएफची मदत प्रातिनिधीक, पण तुमची मदत तुम्ही केली पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
- ‘केंद्राने पाऊल उचलले चला राज्य सरकारला सांगा २५ रूपये कमी करायला’ भाजपचे राऊतांना आवाहन

