नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील भाजप नेते हे राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या भेटीमागे प्रदेशाध्यक्ष बदलाचे कारण असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील हे कालच दिल्लीत दाखल झाले असून ते देखील विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत. यासोबतच उद्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची बैठक पार पडणार आहे. यावेळी चंद्रकांत पाटील हे देखील हजर असतील.
तर, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर नेते देखील राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेत असून चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार असे तर्क लावले आहेत, दरम्यान, आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी जाऊन चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. यावेळी, चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही,’ असं भाष्य करत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला मिश्किल टोला लगावला आहे. पुढे त्यांनी दिल्ली दौऱ्याचे कारण देखील स्पष्ट केलं.
ते म्हणाले, ‘पहिल्यांदाच केंद्रात राज्याला जास्त मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत आलो. त्यांच्या मतदारसंघात जाऊन या मंत्र्यांचं अभिनंदन करणार आहेच. पण दिल्लीत येऊनही त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक होतं. त्यामुळे मी दिल्लीत आलोय. दिल्ली दौऱ्यामागे काहीच राजकीय हेतू नाही.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कशाला त्यांचं नाव घेऊन आमचा दिवस खराब करताय’; नारायण राणेंनी उडवली खिल्ली
- ‘राहुल गांधी हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो’; राणेंची खोचक टीका
- ‘न्यायाच्या या मार्गावर आम्ही ‘ती’च्या सोबत आहोत,’अशोक चव्हाणांचे आश्वासन
- ‘महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत, १६ ऑगस्टनंतर…,’ नारायण राणेंचा इशारा
- आर्या आंबेकरच्या रिमिक्स गाण्यावर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
