Share

‘शिक्षणाचा बोजवारा : मनमानी शुल्क आकारणीस ठाकरे सरकारचा छुपा पाठिंबा’

Published On: 

पुणे : ठाकरे सरकारच्या वेळकाढू आणि बेपर्वा धोरणामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा पुरता बोजवारा वाजला आहे. शैक्षणिक शुल्क निश्चितीचा प्रस्तावही राज्य सरकारने खुंटीवर टांगल्यामुळे हजारो पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे. शुल्कनिश्चिती बाबत दिरंगाई करून ठाकरे सरकार जाणीवपूर्वक शाळाचालकांना मनमानी शुल्क आकारणीस मुभा देत असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा आर्थिक फटका बसला असून तातडीने शैक्षणिक शुल्क निश्चित न केल्यास पालकांच्या असंतोषाचा जो उद्रेक होईल त्याला तोंड द्यावं लागेल, असा इशारा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पुणे येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना केला.

गेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्यानंतर यंदाही ऑनलाईन शाळा सुरु असतानाही शाळांकडून सक्तीने जबर फी आकारणी केली जात असल्याने हजारो कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोनामुळे उत्पन्न घटले असतानांच शाळांच्या मनमानीस मुभा देऊन ठाकरे सरकार सामान्य माणसांची लुबाडणूक करण्यास थेट हातभार लावत आहे.

एक तर शैक्षणिक वर्ष सुरु नसल्याने शाळांच्या आस्थपना खर्चास मोठी बचत झाली आहे दुसरीकडे पालकांना मात्र ऑनलाईन शिक्षणासाठी संगणक, इंटरनेट सुविधांच्या वाढत्या खर्चाचे नवे ओझे पेलावे लागत आहे. राज्य सरकार कडून कोणतीही मदत नाहीच, उलट लुबाडणूक करणाऱ्यांकडे डोळेझाक करून राज्य सरकारने सामान्य कुटुंबांचे जगणे संकटात टाकले आहे.

शुल्क निश्चितीच्या प्रस्तावावर धूळ साचूनही त्यावर निर्णय घेण्यात दिरंगाई करून राज्य सरकार कोणाचे हितसंबंध जपत आहे, हे पालकांच्या लक्षात येऊ लागले असून कोरोनाचे कारण देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारच्या विरोधातील असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट न पाहता तातडीने भरमसाठ फी आकारणीचा छाप लावून शिक्षण व्यवस्था रुळावर आणावी अशी मागणी माधव भांडारी यांनी केली आहे.

शाळा बंद असल्यामुळे शाळांमधील ज्या सुविधा विद्यार्थी वापरत नाहीत त्याचे शुल्क आकारू नयेत असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असूनही राज्यातील अनेक शिक्षण संस्था संपूर्ण फी एकरकमी भरण्याची सक्ती पालकांवर करत असल्याच्या तक्रारी आहेत. फी न भरल्यास ऑनलाईन वर्गात प्रवेश दिला जात नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या मूलभूत हक्कांपासून विद्यार्थी वंचित राहणार असून यासाठी राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा भांडारी यांनी दिला आहे.

शिक्षण हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असल्याने संतापाचा उद्रेक होण्याची वाट न पाहता शिक्षणाचा बोजवारा उडविणाऱ्या संस्थांच्या मनमानीस आळा घालावा असे भांडारी म्हणाले. यावेळी भाजपा पुणे शहर चिटणीस सुनील माने व भाजपा शिक्षण विभागाच्या सीमा तन्वर उपस्थित होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!