Share

‘ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत निर्मिती करण्यास प्राधान्य’, नगरकरांना पालकमंत्र्यांचा दिलासा

Published On: 

अहमदनगर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या अनुषंगाने आरोग्यविषयक सुविधांच्या बळकटीकरणासोबतच आवश्यक ऑक्सीजन निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत उभारणी करणे आणि पुरेशी साठवणूक क्षमता यास प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला.

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी, जिल्ह्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, लसीकरणाची सद्यस्थिती, कोणत्या भागात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या, त्यासाठीचा उपलब्ध औषधसाठा, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेली तयारी आदींचा आढावा घेतला.

जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र आहे. दुसरी लाट ओसरत चालली असली तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या घेणे आणि बाधितांना शोधून संपर्क साखळी तोडणे महत्वाचे आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट कमी कमी होत आहे. जून महिन्याच्या अखेरीस हा दर केवळ ३.३७ टक्के इतका खाली आला आहे. नागरिकांनी काळजी घेतली तर आपण कोरोनाला रोखू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला तयारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार, जिल्ह्यात नव्याने १४ ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. दुसऱ्या लाटेत जिल्ह्याची ऑक्सीजनची सर्वाधिक मागणी ७६ मेट्रीक टन इतकी होती. त्याच्या तीन पट (२२८ मे. टन) मागणीची आवश्यकता गृहित धरुन ऑक्सीजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता निर्माण करण्याच्या सूचना दिल्या असून त्याप्रमाणे जिल्हा प्रशासन कार्यवाही करत असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारकडून राज्याला लस मिळण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे पाहिजे तितक्या वेगाने लसीकरण मोहिम राबविता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्राप्त लशीचे योग्य नियोजन करुन शक्य तितक्या वेगाने लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. सध्या जिल्ह्यात ९ लाख ९५ हजार ५८९ व्यक्तींनी लसीची मात्रा घेतल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे ८ लाख १९ हजार २७० आणि कोवॅक्सिनचे १ लाख ९० हजार २६० असे एकूण १० लाख ९ हजार ५३० डोस प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!