मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत. भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत संभाजी छत्रपती यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.
तसेच यावेळी संभाजीराजेंनी मराठा आरक्षण टिकवण्यासाठी पर्यायही सांगितले आहेत. यावेळी ते बोलताना म्हणाले कि, ‘ओबीसीमध्ये नवीन प्रवर्ग तयार करणं शक्य आहे का? हे पाहावं’ असे त्यांनी सांगितले होते. यावर आता ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रकाश शेंडगे यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मराठा समाज मागासवर्गीय होत नाही, तोपर्यंत ते ओबीसीत येऊच शकत नाही, त्यांचं उपवर्गीकरण करणं शक्य नाही, असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.
महाराजांनी अभ्यास करून विषय मांडले आहेत. पण मराठ्यांना ओबीसीत घ्यावं की घेऊ नये याबाबतचं त्यांचं वक्तव्य संशयास्पद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याचा कधीच निर्णय घेतला आहे. मग तरीही समाजात संभ्रम निर्माण का केला जात आहे? महाराजांनी ही भूमिका बदलली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी संभाजी छत्रपती यांच्यावरही टीका केली. महाराज स्वत:ला बहुजनांचे नेते म्हणवून घेतात. पण मग बहुजनांचं नेतृत्व करताना त्यांना ओबीसींचा विसर कसा पडतो? महाराज केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करतात. धनगर आरक्षणावर कधी बोलणार?, असे सवाल करतानाच बहुजनांचे नेते म्हणवून घेत असाल तर महाराजांनी पदोन्नतीतील आरक्षणावर बोलावं, असं आवाहन शेंडगे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध’
- ‘चंद्रकात पाटील ‘त्या’वेळी जागे होते की झोपेत?’, अजितदादांनी घेतली फिरकी
- महाविकास आघाडी सरकार अडचणीत! मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव
- ‘..तरीही मोदींनी संभाजीराजेंना भेट द्यायलाच हवी’, राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचले
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

