मुंबई : कोरोना महामारीने पुन्हा एकदा देशभरात थैमान घातलं आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशातही, रुग्णालय कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स हे कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या प्राणांची बाजी लावून लढत आहेत.
मात्र, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक रुग्णालयात ‘राडा’ घालत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. यामुळे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण देखील वाढत आहेत. यासंदर्भात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं आहे.
‘आपल्याला डॉक्टरांना आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना सुरक्षित करावंच लागेल. विशेषत: जेव्हा ते अत्यंत तणावाच्या परिस्थितीत आपल्यासाठी अथकपणे काम करत आहेत,’ असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती दिपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर डॉ. राजीव जोशी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी सुरु असताना न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं आहे.
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित योग्य पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. ‘ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जर आपण डॉक्टरांना सुरक्षा पुरवू शकलो नाहीत, तर एक जबाबदार राज्य म्हणून तो आपला पराभव ठरेल. ते समाजाला वाचवत आहेत,’ अशा शब्दांत राज्य सरकारला चपराक लगावली आहे. यासोबतच, ‘प्रशासनाकडून निर्माण झालेल्या ऑक्सिजन किंवा औषधांच्या तुटवड्यासाठी डॉक्टरांना बळीचा बकरा बनवला जाऊ शकत नाही,’ असं देखील नमूद केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोस्ताना नंतर कार्तिकच्या हातात बिग बजेट सिनेमा ; मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम
- अभिनेता आरोह वेलणकरने पहिल्यांदाच शेअर केला आपल्या चिमुकल्यासोबतचा फोटो
- अन् ‘शक्तिमान’ हादरला; आधी स्वतः मृत झाल्याच्या अफवा नंतर बहिणीच्या मृत्यूची वार्ता !
- पुण्याच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ ! तर कोरोनामुक्तांचा आकडा अधिकच
- ‘बिनपगारी प्रवक्त्यांनी पवार साहेबांविरुद्ध कितीही ओरड केली तरी…’


