मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. तर, बड्या नेत्यांसह अनेक कलाकारांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. या रोगामुळे अनेक कुटुंबियांना आपला आधार गमवावा लागत असून घरातील कर्ता माणूसच हिरावल्याने उदर्निर्वासासह भविष्याची चिंता सतावत आहे.
अशातच, आता भारतातील नामांकित उद्योगसमूह बजाज ग्रुपच्या बजाज ऑटो लिमिटेडने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, बजाज ऑटोच्या एखाद्या कायम असणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोना विषाणू ससंर्गामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन वर्षांपर्यंतचा पगार देण्यात येईल. मुलांच्या शिक्षणावर देखील खर्च केला जाईल, अशी घोषणा केली आहे.
यासंदर्भात ‘बजाज’ने लिंकडीनवर एक पोस्ट करून माहिती दिली आहे. कोरोना काळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पगाराची रक्कम जी दरमहा 2 लाखापर्यंत असेल ती २४ महिन्यांसाठी त्याच्या कुटुंबाला दिली जाईल. याशिवाय त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांच्या नातेवाईकांचा 5 वर्षांचा वैद्यकीय विमा देखील काढण्यात येईल. याशिवाय दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बजाज ऑटो कर्मचाऱ्याच्या मुलाच्या खर्चासाठी 12 पर्यंतच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये दरवर्षी देईल. तसेच, पदवीचं शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी 5 लाखांचा खर्च बजाज ऑटो करेल, अशी माहिती बजाजतर्फे देण्यात आली आहे. तर, याआधी बोरोसिल अँड बोरोसिल रिन्यूवेबल्स, मुथूट फायनान्स या कंपन्यांनी कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास २ वर्षांचा पगार कुटुंबियांना मदत म्हणून देण्याची घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आ.संजय गायकवाडांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट
- ‘… त्यानंतर मला खूप भीती वाटली’ ; ऋद्धिमानने सांगितल्या कोव्हिड काळातील यातना
- ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवारांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तू…’
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार ५ हजारांची पेन्शन,शिक्षणही मिळणार मोफत
- खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट, मनपा व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष!


