यवतमाळ : १६ तालुक्यांचा जिल्हा असलेला यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री नाहीये. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या संकटात निर्णय घ्यायला अडचणी येत आहेत. अशा कोरोनाच्या भयावह संकटामध्ये पालकमंत्री देण्यात यावे, अशी विनंती खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याची दखल घेवून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री आ.संदीपान भुमरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. पण त्यांच्यासमोर यवतमाळ जिल्ह्यात कोरोनासह अनेक आव्हाने असणार आहेत.
सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाने कहर केला आहे. दररोज सरासरी २० वर रुग्णांचा मृत्यू होत असून एक हजारांवर बाधित होत आहे. सध्या जिल्ह्यात पाच हजार सक्रिय करोनाबाधित आहेत. रूग्णांना शासकीय, खासगी दवाखान्यात जागा मिळत नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शिवसेनेचे आमदार असलेले सांदीपान भुमरे यांच्या नियुक्तीने स्थानिक शिवसेना नेतृत्वासही धक्का बसला आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेचे सत्ताकेंद्र तीन ठिकाणी विभागणार तर नाही ना, अशी शंका शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे. ‘भुमरे हे यवतमाळ जिल्ह्यातील कोविड परिस्थिती, शिवसेनेच्या दोन गटात विभागलेले राजकारण, महाविकास सरकारमधील घटक असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध या सर्व गोष्टींना कसे सामोरे जातील, याबाबत जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याने स्थानिक शिवसैनिक नाराज झाले आहेत. पक्षप्रमुखांनी राठोड यांच्यावर अन्याय केला अशी भावना अनेक शिवसैनिकांच्या मनात खदखदत आहे. त्यामुळे शिवसेनेचे निष्ठावंत मंत्री भुमरे यांना कितपत सहकार्य करतील हा देखील मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या सावटात जिल्ह्यातील इतर अनेक मुलभूत प्रश्न मागे पडले आहेत. पण संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर त्यामुळे जिल्ह्याची विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचे आव्हान नवीन पालकमंत्री भुमरे हे कशा पद्धतीने स्वीकारतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘खबरदारी घ्या, अन्यथा परिस्थितीबाहेर जाईल’, आ.संजय राठोड यांचा इशारा
- भाजप नेत्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आ.संजय गायकवाडांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- पंजाबचा नादच खुळा!, अर्शदीप सिंगने केला ‘गब्बर’च्या स्टाईलमध्ये जल्लोश
- आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर! जालना जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा, रुग्णांचे हाल


