पंढरपूर – भारतनाना आपल्याला अर्ध्यात सोडून जातील आणि त्यांच्या जागी त्यांच्या मुलाचा प्रचार करण्याची वेळ माझ्यावर येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. नानांनी मला नेहमीच वडीलकीची माया दिली. आज त्यांच्या जागी पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव भगीरथदादा उभे आहेत, भगीरथदादा नानांचे केवळ रक्ताचे नाही तर नानांच्या विचारांचे आणि या भागाच्या विकासाचे जे स्वप्न नानांनी पाहिले त्या स्वप्नाचे देखील वारसदार आहेत, या वारसदारास मी आशीर्वाद मागायला आलो आहे, अशी भावनिक साद सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाकडी येथील प्रचार सभेत घातली आहे.
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे सर्व वारकरी दिंड्या विसाव्यास येतात, आज येथे प्रचारास येणे हा माझ्यासाठी भाग्याचा योगायोग आहे. ही निवडणूक पक्ष विरुद्ध पक्ष अशी नसून आता सत्य विरुद्ध प्रत्येक गोष्टीत हीन दर्जाचे राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती अशी आहे आणि या अपप्रवृत्तींना इथल्या जनतेनेच आता ‘रिंगण’ दाखवावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले.
पंढरपूर तालुक्यातील वाखरी व मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे धनंजय मुंडे यांच्या जोरदार प्रचारसभा झाल्या. या सभेस माजी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंके पाटील, माजी आमदार राजू आवाळे, उमेश पाटील, उमेदवार भगीरथ भालके, साईनाथ अभंगराव, दिलीप धोत्रे, सावता परिषदेचे कल्याणराव आखाडे, सुधीर भोसले, शलाका पाटील, शालिवाहन कोळेकर, श्रेया भोसले, संग्राम गायकवाड, सुवर्णा बागल, संदीप मांडवे, शुभांगी भोईटे, मारुती पोरे, ऍड. राजेश भादुले, नागेश यादव यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे, यांसह मित्रपक्ष आघाडीचे नेते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी कच्च्या गुरूचा चेला नाही, असे भारत नाना म्हणायचे, मी देखील कच्च्या गुरूचा चेला नाही असे म्हणत धनंजय मुंडेंनी विरोधकांचा समाचार घेतला. पवारसाहेबांच्या पावसाच्या सभेची आठवण सांगत, काल परवा जयंत पाटील यांच्या सभेत पाऊस आला आणि विरोधकांनी त्याचा धसकाच घेतला, त्यांना आमच्या सभांमध्ये पाऊस आला की धसकाच बसतो, अशी मिश्किल टिप्पणी धनंजय मुंडेंनी केली.
दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी कित्येक दिवसांपासून केंद्रसरकारच्या विरोधात आंदोलनाला बसले आहेत आणि भाजपचे नेते आम्हाला शेतकरी विरोधी म्हणतात! मुळात केंद्रातले सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आणि धनदांडग्यांच्या हिशोबात आहे, अशी टीकाही यावेळी धनंजय मुंडेंनी केली.
सत्ता काबीज करण्याच्या नादात भाजपकडून अत्यंत हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे. भारत नानांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या विकासाच्या स्वप्नांवर, त्यांच्या कुटुंबावर टीका करणे हे या अपप्रवृत्तींनी सुरू केले आहे, या अपप्रवृत्ती भगीरथदादांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन इथल्या जनतेने ठेचून काढाव्यात असे आवाहनही यावेळी धनंजय मुंडे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- मरण झाले स्वस्त! उस्मानाबादेत एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंतिम संस्कार
- पराभव पचविणे अवघड आहे ; खराब फलंदाजीमुळे सामना गमावला : वॉर्नर
- राज्यपालांनी आपापल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सक्रीय सहकार्य करावं – नायडू
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

