🕒 1 min read
औरंगाबाद : दररोज शहरात हजारांच्या पुढे रुग्णसंख्या निघत आहे. शहर हॉटस्पॉट होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असतांना महापालिकेने आता सहा एन्ट्री पॉइंटवर चोवीस तास पथके तैनात केली आहेत. आजपासून (दि.२०) या पथकांमार्फत प्रवाशांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. स्क्रिनिंगमध्ये ज्यांना लक्षणे दिसतील त्यांची अॅन्टीजेन चाचणी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. हा निर्णय आधिच घेतला असता तर रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यात काही अंशी यश आले असते, हेही तितकेच खरे.
गतवर्षी बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या प्रवाशांची एन्ट्री पॉइंटवर तपासणी करण्यात आली होती. त्यात हजारो जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांना नाक्यावरूनच कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे शहरात होणारा संसर्ग कमी झाला. आता पुन्हा एकदा शहराच्या एन्ट्री पॉइंटवर चाचण्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरात येणारी वाहने थांबवून प्रवाशांची स्क्रिनिंग सुरु करण्यात आली आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसून येतील, त्यांच्या चाचण्या करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाईल. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्यांनाच शहरात प्रवेश दिला जाईल, असे पाडळकर यांनी नमूद केले.
या ठिकाणी तपासणी सुरु
चिकलठाणा येथील केंब्रीज शाळा चौक, सावंगी येथील टोल नाका, दौलताबाद टी पॉइंट, नक्षत्रवाडी, झाल्टा फाटा या ठिकाणी कोरोना चाचणीसाठी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. कोरोना संसर्ग अधिक असलेली १९ वॉर्ड महापालिकेने रेड झोनमध्ये टाकली आहेत. याठिकाणी जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. हीच पथके लसीकरणासाठी देखील मदत करणार आहेत, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.
नियोजन करणार कसे?
महापालिकेने शहराच्या सिटी एन्ट्री पॉईंटवर कोरोना चाचण्या आजपासून सुरु केल्या आहेत. मात्र सध्या अंशतः लॉकडाउन आणि शनिवार रविवार कडक लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे कुठलेही निर्बंध नसल्याने बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवरही कुठलेही निर्बंध नाहीत. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्यांचे लोंढेच्या लोंढे, वाहनांच्या रांगा लागल्या तर मनपाचे पथक कशाप्रकारे नियोजन करेल हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारी बसेस, खासगी वाहने, वैयक्तिक वाहनांचा रांगा लागून गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणजे झाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
- ‘मास्क का नाही घातला’ असे विचारताच,पालिकेच्या कर्मचाऱ्याला महिलेने केली मारहाण
- ‘अभिन्न’ घडवणार मुला, मुलींची लिंगभेदा विषयी सकारात्मक मानसिकता, मोक्षदा पाटील यांचा उपक्रम
- दहावी-बारावीची लेखी परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार
- शिवरायांचा एकेरी उल्लेख : प्रश्नपत्रिकेवरून वाद निर्माण झाल्यानंतर शिष्यवृत्ती कमिटीचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

