🕒 1 min read
मुंबई- योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला 19 मार्च रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी योगी सरकारसह सर्व उत्तर प्रदेशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात राम नाईक म्हणतात, ‘‘मी जेव्हा 2014 मध्ये राज्यपालपदाची शपथ घेतली तेव्हा उत्तर प्रदेश ‘उत्तम प्रदेश’ करण्याचा मानस व्यक्त केला होता. माझी ही इच्छा योगी सरकारने साकार केली आहे. आता तर मला लवकरच उत्तर प्रदेश ‘सर्वोत्तम प्रदेश’ होईल असे वाटते आहे.’’
उत्तर प्रदेश म्हणजे अगणित संधींचे भांडार आहे. योग्य दिशा मिळाली तर उत्तर प्रदेशाची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही असे सांगून नाईक म्हणाले, ‘‘उत्तर प्रदेशात व्यापार-उद्योग तेजीने वाढतो आहे याचे मला विशेष समाधान वाटते. त्यामुळे 35 लाखांहून अधिक युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. विश्व बँकेच्या मानकांनुसार सध्या देशात आंध्रप्रदेशानंतर व्यवसाय करण्यास सुलभ (ईज ऑफ डूईंग बिजिनेस) उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. पूर्वी तो 14व्या क्रमांकावर होता. या प्रगतीमुळेच आतापर्यंत उत्तर प्रदेशातल्या खाजगी क्षेत्रांमध्ये रु. तीन लाख कोटींहून अधिक गुंतवणूक झाली आहे. महसूलातही लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ष 2017 मध्ये जी.एस.टी. द्वारे रु.49 हजार कोटी महसूल जमा झाला होता, तो आता वाढून रु. 1 लाख कोटी इतका झाला आहे.’’
अर्थव्यवस्थेसोबतच न्याय व्यवस्थेतील सुधाराबद्दलही राम नाईक यांनी विशेष आनंद व्यक्त केला. कायदा सुव्यवस्था चांगली असेल तरच माफियांची रु. 1 हजार कोटीपेक्षा अधिक अवैध संपत्तीजप्त होऊ शकते अशी टिप्पणी करून श्री नाईक म्हणाले, ‘‘महिलांसाठी 1500 हून अधिक पोलीस ठाण्यांमध्ये मदत कक्ष स्थापन केल्यामुळे राज्यातील महिलांना नक्कीच अधिक सुरक्षित व सबल वाटत असेल. चार वर्षात उत्तर प्रदेशात एकही जातीय दंगा झाला नाही.’’
पुर्वांचलात गेली कित्येक वर्षे इंसेफेलाइटीस आजारामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत. या संकटावरही योगी सरकारने नियंत्रण आणून मृत्यूदर 91% कमी केला आहे. स्वच्छतेच्या प्रयत्नांमध्ये योगी सरकार कुठलीही कमतरता बाळगत नाहीत याचाच हा पुरावाच आहे, असे राम नाईक यांना वाटते. सरकारच्या अशाच अथक प्रयत्नांचे काशी, प्रयागराज आणि अयोध्येच्या विकासातदेखील योगदान आहे.
योगी आदित्यनाथ व मंत्री मंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांना चार वर्षांपूर्वी राम नाईक यांनीच शपथ दिली होती. स्वाभाविकच या सरकारच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राम नाईक यांना विशेष समाधान वाटते आहे. या सरकारने वर्ष 2019 मध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभाचे सफल आयोजन केले. त्यावेळी महाकुंभ आयोजन समितीचे अध्यक्ष असलेले राम नाईक म्हणाले, ‘’24 कोटी भाविक आलेल्या महाकुंभाच्या वेळेस सुरक्षा, स्वच्छता आणि सुव्यवस्था राखणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. त्या परीक्षेत खऱ्या उतरलेल्या योगी सरकारला हाच अनुभव कोरोनाला रोखण्यास कामी आला असावा.’’ संपूर्ण जगात उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे सर्वात योग्य व्यवस्थापन झाले असे मानले जाते याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले.
योगी आदित्यनाथांच्या चार वर्षांच्या कारकीर्दीस शुभेच्छा देत, योगीजींच्या नेतृत्वात आगामी काळात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा अशा शुभेच्छा राम नाईक यांनी दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वीला संधी नाहीच
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
