औरंगाबाद : शहरात जसजसे कोरोना रुग्ण वाढत आहोत तसतसे कोविड सेंटरबाबत समस्या वाढतच आहेत. बेड फुल झाल्याने रुग्णांवर कधी बाकावर झोपायची वेळ येत आहे, तर कुठे रुग्णांना गेटवरच अडवून धरण्यासारखे प्रकार समोर येत आहेत. नुकतेच सिपेट कोविड सेंटरच्या प्रवेशद्वारावर अत्यवस्थ परिस्थितीत असलेल्या रुग्णास बसवून ठेवण्यासारखा गंभीर प्रकार समोर आला आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने येथे भरती होण्यासाठी आलेल्या काही रुग्णांच्या नातेवाईकांनी रौद्रावतार धारण करताच कर्मचाऱ्यांनी आपली भाषा बदलली. आणि त्या अस्वस्थ रुग्णास भरती करुन घेण्याची तत्परता दाखवली.
या सर्व प्रकारांमध्ये प्रशासन आता निर्ढावले असून रुग्णांच्या समस्येशी त्यांना कुठलेही सोयरसुतक राहिले नसल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोनाने आपले काम सुरु केले आहे. १०० पासून सुरु झालेली रुग्णसंख्या आता दररोज हजारांच्या पुढे जाऊन ठेपली आहे. कोरोना रूग्णांची संख्या गतीने वाढत असल्याने शासकीय तसेच खासगी रूग्णालये देखील रूग्णांची हाऊसफुल झाली आहेत.
त्यामुळे वेळप्रसंगी काहींना बेड उपलब्ध होत नसल्याने कोरोना रूग्ण शहरातच भटकंती करत असल्याचे प्रकारही घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरातील एका कुटुंबातील एक महिला पॉझिटिव्ह आल्याने घरातील सर्वांची अँटिजेन आणि नंतर आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
आपल्या पॉझिटिव्ह आलेल्या बहिणीला कोविड सेंटरमध्ये भरती करण्यासाठी सर्वप्रथम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात गेले असता हे सेंटर फुल झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. येथून ते सिपेट कोविड सेंटरमध्ये गेले असता याठिकाणी रुग्णांना गेटवरच अडवले जात असल्याचे त्यांना दिसून आले. सिपेट सेंटरमध्ये त्यांना जवळपास २ तास ताटकळत थांबावे लागले.
याठिकाणी एक जेष्ठ नागरिक अस्वस्थ वाटत असल्याने गेटवरच खाली बसला होता. या रुग्णासाठी तरी एका जागेची व्यवस्था करा यासाठी उपस्थितांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या रुग्णाकरीता एक बेड देण्यात आला. मात्र कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि बेफिकीर वृत्ती दिसून आल्याचे प्रत्यदर्शींनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना सांगितले.
याप्रमाणेच किलेअर्क कोविड सेंटर वर देखील पुन्हा एकदा रुग्णांना अशाचप्रकारचे अनुभव आले. याठिकाणी टेस्ट केलेल्या काहींनी आपण पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह आलो याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांचा अरेरावीपणा पुन्हा एकदा दिसून आला. येथील कर्मचारी कुठल्याही प्रकारचे साहाय्य करत नसल्याचे सदर रुग्णाने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांना वाजेंसाठी बैठका घ्यायला वेळ आहे, पण जनतेच्या प्रश्नांसाठी बैठका घ्यायला नाही’
- औरंगाबादेत रुग्णांची वाढ; २१ नवीन सेंटर सुरू होणार
- जिंतूर, सेलूमधील पुलांसाठी ७ कोटी मंजूर
- पाच हजारांची लाच घेताना आरटीओ एजंटला रंगेहाथ पकडले
- डीसीसीच्या प्रचाराची रणधुमाळी, मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
