बीड : राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
बस महामंडळाच्या विभागीय भांडार शाखेतील सहायक पदावर कार्यरत महिलेला निलंबित का केले, असा जाब विचारत बीड एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्या दालनात घुसून अर्वाच्च शिवीगाळ करत जीवे मारण्याची दिल्याचा प्रकार जानेवारी महिन्यात घडला होता. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यासह दहा जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्या फिर्यादीनुसार, विभागीय भांडार शाखेतील सहायक पदावरील महिला कर्मचाऱ्याने नियोजित काम करण्यास नकार दिला होता. यावर पर्यवेक्षकाच्या अहवालावरुन १५ जानेवारी रोजी विभागीय भांडार अधिकाऱ्यांनी सदरील महिला कर्मचाऱ्यास निलंबित केले. याशिवाय इतर तीन कर्मचाऱ्यांवरही कामात हलगर्जी केल्याचा ठपका ठेऊन निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, महिला कर्मचाऱ्याने निलंबनाची कारवाई करणाऱ्या पर्यवेक्षकाविरुध्द मारहाणीची तक्रार विभागीय भांडार अधिकाऱ्यांकडे केलेली आहे.
त्यानंतर वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगरसह ९ ते १० जण विभागीय नियंत्रकांच्या दालनात आले. त्यांनी ‘महिला कर्मचाऱ्यास निलंबित का केले’ असा प्रश्न केला. त्यावर परस्परविरोधी तक्रारी असून कोणावरही एकतर्फी कारवाई केलेली नसल्याचा खुलासा जगनोर यांनी केला. त्यावर ‘तुला रस्त्यावर चालणे मुश्कील होईल असे म्हणत टेबलवरील लाकडी ट्रे उचलून अर्वाच्च शिवीगाळ केली. तसेच ते सर्व जण अंगावर धावून आले. इतर कर्मचाऱ्यांनी सोडवासोडव केल्यावर ‘तू बाहेर निघ तुला दाखवतो’ असे म्हणत विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा खुर्ची उचलून ते अंगावर आले.
दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी प्रा. बांगर यांनी सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज केला.न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर उच्च न्यायालयात त्यांनी अर्ज केला. तोही फेटाळला गेला. यानंतर शिवाजीनगर पोलिसांना ते मंगळवारी शरण आले. पोलिसांनी त्यांना अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक शैलेश शेजूळ यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी‘एसओपी’ लागू, अजित पवारांची घोषणा
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
