🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यभरात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून सोशल डिंस्टसिंगच्या नियमांची अंमलबजावणी होत नाही. यामुळे आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाविरुद्ध लढाईत थेट शाळकरी मुलांना पत्र लिहिले आहे. “बाहेर जाताना आई-बाबांनी मास्क घातला की नाही ते पाहा, बाहेरून आल्यावर त्यांनी हातपाय स्वच्छ धुतलेत का, सॅनिटायझर वापरलं की नाही तेदेखील पाहा”, असा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी मुलांना दिला आहे.
पत्रात आरोग्यमंत्री म्हणतात….
प्रिय विद्यार्थी मित्रांनो, शाळा, महाविद्यालये नुकतेच सुरू झाले आणि कोरोना वाढताना दिसत आहे. कोरोनाविरुद्ध लढाई गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. तुमच्या सर्वांच्या आणि महाराष्ट्राच्या मदतीने आपण ही लढाई नक्कीच जिंकणार यांत शंका नाही. तुमचं खेळण्याचं, क्रीडांगणावर घाम गाळण्याचं हे वय आहे. परंतु गेले वर्षभर तुम्हाला घरातच बसावं लागलं. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ती अशी की, प्रथम तुम्ही तुमची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना मास्क लावला का, बाहेरून आल्यावर त्यांनी हातपाय स्वच्छ धुतलेत का, सॅनिटायझर वापरलं की नाही तेदेखील पाहा. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कदाचित कोरोनाची काही लक्षणे दिसलीच तर त्यांना लगेच सरकारी दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असा विश्वासही आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पत्रातून दिला आहे.
विद्यार्थी, तरुण हा देशाचा उद्याचा आधारस्तंभ
“आजचा विद्यार्थी, तरुण हा देशाचा उद्याचा आधारस्तंभ असून सुदृढ शरीर, सकारात्मक मन, बुद्धी सतेज पाहिजे तरच त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात. तेव्हाच तो जीवनात यशस्वी होतो”, असा प्रेरणादायी सल्लाही टोपेंनी मुलांना दिला आहे.
उपचार सुरू असताना आरोग्यमंत्र्यांचे काम सुरू
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनाची साथ आल्यापासून त्यांनी गेल्या वर्षभरात राज्यभर सातत्याने दौरे करून कोरोना लढाईत आरोग्य कर्मचारी, सेवकांच्या सोबत काम केले. आता त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितही टोपेंनी आपले काम सुरू ठेवले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शहरांची नावं बदलता बदलता भाजपच्या मुख्यमंत्र्यांने चक्क फळाचे देखील नाव बदलले
- पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
