मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
मात्र, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मुंडेंची आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली आहे. ‘दुसरी पत्नी व अपत्यांबाबतची माहिती, त्यांच्यावर केलेला खर्च निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी असे पत्र निवडणूक आयोगाला लिहिल्याचे’ त्यांनी सांगितले होते. यानंतर भाजपमधील अन्य नेत्यांनी देखील प्रतिज्ञापत्रात मुंडेंनी लपवलेल्या माहितीवरून टीकास्त्र सोडलं होतं.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर पलटवार केला आहे. ‘धनंजय मुंडेंनी शपथपत्रात माहिती लपवली की नाही हे पाहावं लागेल. त्यातील काही तांत्रिक गोष्टी पाहाव्या लागतील. देशात अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत. देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनीही शपथपत्रात माहिती लपवली होती. त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही’, असं म्हणत त्यांनी मुंडे यांची पाठराखणच केली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- विषय पंपावर : भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त चक्क पेट्रोल २ रुपये स्वस्त !
- कर्ज देणाऱ्या ॲप्स संदर्भात आरबीआय आणि केंद्र सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस
- सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; शरद पवारांची ठाम भूमिका
- हनीट्रॅपमुळे फक्त मुंडेंची नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी होत आहे – संजय राऊत
- धनंजय मुंडेंना संरक्षण द्या, त्यांचा तातडीने राजीनामा घेऊ नका – संजय राऊत

