🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने अष्टविनायक प्रतिष्ठान तर्फे आयोजित राष्ट्रीय संगीत, नृत्य स्पर्धेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी महाराष्ट्रात संगीत विद्यापीठ उभारले जाणार असल्याची घोषणा केली.
अमित देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात एकही संगीत विद्यापीठ नाही. त्यामुळे संगीत, नृत्य, लोककला अशा कलांना सामावून घेणारे संगीत विद्यापीठ महाराष्ट्रात उभारले जाईल. तसेच जिल्हा तिथे कलाअकादमी सुरू करण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.
विविध प्रकारच्या कलांना, संस्कृतीला पाठबळ मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून नागरिकांनी आमच्याकडे सूचना कराव्यात. सांस्कृतिक क्षेत्रात काय-काय करता येईल, हे सांगावे. त्यातील चांगल्या बाबींचा नक्कीच सांस्कृतिक धोरणात समावेश केला जाईल. महाराष्ट्रात कला अकादमी ही केवळ मुंबईत आहे. पण, राज्याच्या कानाकोपऱ्यात या अकादमीने पोचले पाहिजे. त्याशिवाय कलेला वाव मिळणार नाही. म्हणून आम्ही ‘जिल्हा तिथे कला अकादमी’ सुरू करत असल्याचे मंत्री देशमुख यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. या लोककलेचा प्रसार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होण्यासाठी आम्ही काही धोरणात बदल केला आहे. लावणी या लोककलेला राज्याच्या सर्व भागांत व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. सरकारच्या वतीने नाट्य स्पर्धा घेतल्या जातात. तशा संगीत आणि नृत्याच्याही घेतल्या जाव्यात, या सूचनेचाही आम्ही नक्कीच विचार करू. सांस्कृतिक धोरणात या सूचनेचा समावेश केला जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले.


