नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लवकरच देशव्यापी लॉकडाऊन जाहीर होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पण, पूर्ण लॉकडाऊन असो किंवा निर्बंध, त्याचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसेल असे सीआयआयच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे कामगारांच्या संख्येबरोबर मालाच्या वाहतुकीवर परिणाम होईल. त्यामुळे औद्योगिक उत्पादनाची समस्या गंभीर होण्याचा अंदाजही यात वर्तवला आहे.
उद्योग संघटना सीआयआयच्या वतीने देशभरातील विविध क्षेत्रातील विभिन्न कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांची लॉकडाऊनसंदर्भात मते जाणून घेतली. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई तसेच औद्योगिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक भीषण स्थिती आहे. राज्य सरकार पूर्णत: लॉकडाऊनच्या बाजूने असून येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्रात काही दिवसांचा जरी लॉकडाऊन लागू केल्यास त्याचा परिणाम देशातील इतर भागांवरही होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षीपेक्षा यंदाची परिस्थिती भीषण असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अनेक राज्ये तसेच शहरांमध्ये आतापासूनच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. काही ठिकाणी उत्पादनांना परवानगी देण्यात आली आहे, तर पुरवठा आणि विक्रीवर बंदी घातली आहे. जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचे? असा प्रश्न उद्योग समूहासमोर पडला आहे. लॉकडाऊनसंदर्भात अनेक सीईओंनी त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्राला होणार असल्याचा दावा केला आहे.
अंशत: लॉकडाऊन जरी केले तरी कामगारांच्या प्रवासासह वस्तुच्या वाहतूक पुरवठ्यावर गंभीर परिणाम होईल. ५६ टक्के सीईओंनी म्हटले की, वाहतुकीवर निर्बंध लागू केल्यास त्याचा थेट परिणाम सर्वच बाबींवर होत असतो. औद्योगिक क्षेत्रातील ५० टक्के उत्पादन यामुळे घटण्याची भीती आहे. लसीकरण मोहीम व्यापकप्रमाणे राबवली जाऊन उद्योगधंदे वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असे मत ६७ टक्के सीईओंनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘जे ऍक्टर होऊ इच्छितात त्यांनी ‘हे’ शिकावं’
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- ‘ब्रेक द चैन’मुळे प्राजक्ता उदास, लिहिली ‘ही’ पोस्ट
- कामगारांची कोरोना तपासणी न केल्याने मेडिकल व्यावसायिकांना दंड
- शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया ;तब्येत स्थिर – नवाब मलिक


