पंढरपूर : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले होते. त्यामुळे राज्यभर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु सध्या देशभरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु अजूनही धोका पूर्णपणे टळला नसल्यामुळे काही अंशी सरकारला निर्बंध लावावे लागत आहेत.सध्या राज्यभरातील धार्मिक कार्यक्रमांना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. याचाच परिणाम आता महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळ्यावर देखील झाला आहे.
महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर आता आषाढी वारी दरम्यान पंढरपुरात संचारबंदी लागण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात स्थानिक पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर केला असून लवकरच संचारबंदीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे पुन्हा चिंता वाढली आहे. यामुळेच आषाढी वारी दरम्यान पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. पंढरपूर आणि आसपासच्या 10 गावांत संचारबंदी ठेवण्यासाठी आम्ही विनंती केली आहे. दिनांक 17 पासून ते 25 जुलैपर्यंत ठेवण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत.
या काळात सोलापूर जिल्हा सीमा, पंढरपूर तालुका सीमा आणि पंढरपूर शहर सीमा अशा तीन ठिकाणी तिहेरी नाकाबंदी करण्यात येणार असून, परवानगी दिलेल्या भाविकांशिवाय कोणालाही आषाढीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. काही भाविक जर पंढरपूरकडे आले, तर त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठविले जाणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले. आषाढी यात्राकाळात चंद्रभागास्नानासाठी भाविकांनी येऊ नये म्हणून चंद्रभागा परिसरात 144 कलम जारी केले जाणार आहे.
ज्या भाविकांना शासनाने परवानगी दिली आहे, अशा भाविकांना पासेस देऊन त्यांनाच नगरप्रदक्षिणा आणि विठ्ठल मंदिरात सोडण्यात येणार आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील नागरिकांनाही बाहेर पडता येणार नसल्याचे सातपुते यांनी सांगितले. सध्या सोलापूर जिह्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे, असे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- सावधान ! ‘डेल्टा प्लस’चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
