भोपाळ : इंटरनेटचे युग अवतरल्यापासून जग जवळ आले आहे. सोशल मीडियाने तर लोकांमध्ये अधिकच जिव्हाळा निर्माण केला आहे. काही जण प्रत्यक्षात भेटल्यावर हालहवाल विचारणार नाहीत. परंतू फेसबूक, व्हाट्स अपच्या माध्यमातून जाणीवपूर्वक मेसेज करतील. यात ‘काही काळजीवाहू’ व्यक्ती मुली, महिलांना ‘जेवलीस का’ हा आपुलकीचा प्रश्न विचारून संभाषण सुरू करण्यास भाग पाडतात. त्यानंतर सुरू होतो शुभेच्छांचा सिलसिला. वाढदिवस असो वा कोणताही सण-उत्सव, शुभेच्छा दिल्याशिवाय बहुतांश नेटीझन्सना चैन पडतच नाही. आपण शुभेच्छा दिल्या नाही तर समोरच्या व्यक्तीचा दिवस आनंदात जाणार नाही असे कदाचित त्यांना वाटत असावे. अशाच प्रकारे शुभेच्छा देणे एका वकिलाला चांगलेच महागात पडले आहे.
हा प्रकार आहे मध्य प्रदेशातील रतलाममधील. तेथील एक वकील जवळपास वीस दिवसांपासून जेलमध्ये आहे. कारण त्याने महिला न्यायाधीशांना मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वकिलाने पाठवलेला मेसेज न्यायाधीशांना ‘आक्षेपार्ह’ वाटल्याने त्यांनी वकिलावर आयटी कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी वकिलाला अटक केली. वकिलाला स्थानिक न्यायालयात जामीन न मिळाल्याने हे प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले आहे.
रतलाम जिल्हा न्यायालयातील महिला न्यायाधीशांचा जानेवारी महिन्यात वाढदिवस होता. वकील विजयने मध्यरात्री न्यायाधीशांच्या मेलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या. त्याने न्यायाधीशांच्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांचा फोटो डाऊनलोड केला आणि तो ग्रीटिंग कार्डच्या स्वरुपात पाठवला. अशा प्रकारच्या शुभेच्छा न्यायाधीशांना पसंत पडल्या नाहीत. त्यांनी वकिलाची तक्रार रतलाम पोलीस स्टेशनमध्ये केली.
तक्रारीनंतर रतलाम पोलिसांनी वकिलाविरोधात आयपीसीच्या कलम 420, 467, 468, 469 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 आणि 41 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला ९ फेब्रुवारी रोजी अटक केली. तेव्हापासून तो जेलमध्येच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे भाजप आ.राणा पाटील नाराज, मंत्री अमित देशमुखांना लिहिले पत्र
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा
- वेतन थकल्याने अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन


