बीड- राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचं सरकार जनतेच्या भावनेशी का खेळतं? हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, वीजेचे बील माफ होत नाही, वैधानिक विकास मंडळाची स्थापना नाही. अर्थसंकल्पात पहिले घोडे पुढे नाचवले आणि आता उद्याचे भावी अधिकारी म्हणुन राज्यात ज्या मुला-मुलींनी एमपीएससी परीक्षा देण्याची तयारी केली त्या परीक्षेचा कोरोनाच्या नावाखाली चार वेळा खेळखंडोबा झाला.
या परीक्षेची पुर्व तयारी त्यासाठी लागलेला आर्थिक खर्च, मुला-मुलींनी घेतलेले कठोर परिश्रम, उद्या परीक्षा आहे म्हणुन हॉलतिकिटही हाती पडले आणि अचानक बातमी परीक्षा रद्दची आली. तेव्हा बिचाऱ्या मुलांची मानसिकता काय झाली असेल?याचा विचार करणे नको. सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी सरकार एक वर्षापासुन खेळत आहे आणि आता तर मुला-मुलींच्या भावनेचीच महाविकास आघाडीच्या सरकारने क्रुर थट्टा चालवल्याचे लक्षात येते.
कालच्या 14 ला होणारी परीक्षा कोरोनाचे कारण सांगुन रद्दची घोषणा केली.मुलांचा आक्रोश आणि विरोधी पक्षाने घेतलेली भुमिका पाहुन चार पाऊलं सरकार मागे जात पुन्हा परीक्षा ठेवली असली तरी दरम्यानच्या काळात मानसिक त्रासाने झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण?असा प्रश्न विचारला तर तीन तिघाडी आणि युवकांच्या भावनेची बिघाडी असं म्हटलं तर वावगं नाही अशी टीका भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
राम कुलकर्णी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणतात, राज्य सेवा पुर्व परीक्षा आणि त्याची पुर्व तयारी हे चित्र डोळ्यासमोर आणल्यानंतर जे परीक्षार्थी असतात मग मुलं असोत की मुली अगोदरच रात्रं दिवस जागरण करीत कठोर परिश्रम घेतलेले असतात. ग्रामीण भागातील मुल-मुली पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर, सांगली, नागपुर अशा ठिकाणी पुर्व तयारीसाठी जावुन त्यांनी शिकवणी घेतलेली असते. त्यावर प्रचंड आर्थिक खर्च झालेला असतो. ज्या मुलांना परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी जाहिर झालेली तारीख आणि पुर्व तयारी अगदी उंच पर्वतावर चढायला जाण्याची मानसिकता जशी असते तसंच म्हणावे लागेल. पण हे सर्व सुरू असताना आले शासनाच्या मना, इथे कुणाचे चालेना उद्या पेपर म्हणता आज तारखा रद्दची बातमी येते. परिणामी मुलांची मानसिक अवस्था फुगलेला फुगा पिन मारून जसा फुटावा तशी होते.
कोरोना संकटाच्या पार्श्र्वभुमीवर राज्यामध्ये चारवेळा ही परीक्षा रद्द झाली. एका मुलाला नाही म्हटलं तरी एकपट खर्च तिथे चारपट करावा लागला. कालच्या चौदा तारखेला परीक्षा ठरली म्हणता एवढेच नव्हे तर हॉलतिकिट पण दिलं असताना अचानक एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्याची वाऱ्यासारखी बातमी पसरते. तेव्हा मुलं हतबल होतात. रस्त्यावर आक्रोश करीत उतरले. विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने हा प्रश्न हातात धरला. सरकारची कानउघाडणी झाली आणि पुन्हा आता 21 मार्चला परीक्षा होणार सरकारनं जाहिर केलं.
मुळात 14 मार्च तारीख रद्द करणं हाच फार मोठा मुर्खपणा सत्ताधाऱ्यांचा म्हणावा लागेल. युवकांच्या भावनेशी सरकार का खेळतं? हा सवाल आता सर्वत्र विचारला जात आहे. खरं तर राज्यामध्ये मागच्या चार महिन्यात वेगवेगळ्या परीक्षा शांतपणे सरकारने घेतल्या आहेत. सरकारची नोकरभरती असेल त्यासाठीची परीक्षा असेल सर्व काही सुरळित आणि शांततेने पार पडलं. राजकीय नेत्यांच्या सभा मोठ्या थाटामाटात पार पडल्या. कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे पदग्रहण समारंभ हजारो कार्यकर्त्यांच्या गर्दीने संपन्न झाला. मात्र गर्दीचे कारण सांगत लोकसेवा आयोगाने कोरोना संसर्गाचे कारण सांगत नेहमीप्रमाणे परीक्षा पुढे ढकलली. एक वर्षात चार वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. खरं तर युवकांची अशी थट्टा सत्ताधारी का करू लागले? हा संशोधनाचा विषय आहे. मुला-मुलींना आर्थिक आणि मानसिक त्रास देण्यास माय-बाप सरकारला काय सभ्यपणा वाटतो?असे अनेक प्रश्न पुढे येवु लागलेत.
काल परीक्षा पुढे ढकलल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तरूणाईचं रक्त खवळलं. आक्रोशातुन संताप पुढे आला. अनेक ठिकाणी आंदोलनाचा मार्ग मुला-मुलींनी पत्करला. भाजपाने कठोर भुमिका घेत या निर्णयाची निंदा केली. परिणाम सरकार जागं झालं आणि पुन्हा तात्काळ 21 मार्च तारीख केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचे खापर लोकसेवा आयोगावर ढकललं. मुळात हा निर्णय सरकारला सांगुनच असतो. गडबड झाली हे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलं तेव्हा मात्र डोळे उघडले आणि आता 21 मार्च तारीख दिली. चारवेळा परीक्षा पुढे ढकलल्यामुळे सरकारच्या भुमिकेवर मुला-मुलींचा व विरोधी पक्षाचा विश्र्वास राहिला नाही. म्हणुन भाजपाच्या आशिष शेलारांनी श्र्वेतपत्रिका काढुन तारीख जाहिर करावी अशी मागणी केली.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारचे मंत्री वेड घेवुन पेडगावला कसे जातात?याचे उदाहरण समोर आले. पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले परीक्षा पुढे ढकलण्याचे मला माहितच नाही. खरं तर माय-बाप सरकारचे मंत्री म्हणजे गणेश मंडळाचे अध्यक्ष नव्हे. पण त्याच भुमिकेत वडेट्टीवार गेले. याचंही नवल जनतेला वाटु लागलं. आता परीक्षा होतील. सरकार सांगेल आम्ही घेतली. पण जे ध्येय गाठण्यासाठी मुला-मुलींनी तयारी केली. मनाची एकाग्रता वाढवली. रात्रंदिवस डोळे फोडत जीवाचं रान केलं आणि अचानक परीक्षा रद्दचा निर्णय तेव्हा खचित झालेल्या मानसिकतेला जबाबदार कोण? तर पुर्णत: सरकार जबाबदार असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
कशामुळे हा त्रास राज्यातील मुला-मुलींना महाविकास आघाडीच्या सरकारने दिला. चारवेळा परीक्षा रद्द करणे म्हणजे जणु काही सुड घेणे असंच म्हणावे लागेल. संसार जीवनात लग्नाची तारीख काढायची. हाळद लागली. दुसऱ्या दिवशी लग्नाची वेळ झाली. अक्षदा वाटप केल्या आणि लग्नच रद्द व पुढची तारीख काढु असा निरोप वर पक्षाचा येणं म्हणजे वधु पक्षाकडील मंडळीची परीक्षा घेणं असं म्हणावे लागेल. तसाच प्रयोग सत्ताधाऱ्यांनी एमपीएससी परीक्षेचा राज्यात करून खेळखंडोबा केला. राज्यात सरकार चालवणं.त्यासाठी येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नोहे असंच म्हणावे लागेल. लहरी राजा, प्रजा आंधळी, मना येईल तसं निर्णय घ्यायचे. ज्या निर्णयाचा लोकांना किती मानसिक त्रास होईल? हा विचार करायचा नाही. मन मानेल तसा कारभार करायचा. अशी भुमिका राज्यातील सत्ताधाऱ्यांची आहे.
उद्याच्या 21 मार्चला परीक्षा जाहिर झाली असली तरी आता त्यामध्ये बदल होवु शकतो अशीच भावना मुला-मुलींच्या मनात आहे. सरकारचं काही खरं नाही. हा संदेश जनतेमध्ये जावुन पोहोचला आहे. कदाचित परीक्षा होईल पण या सर्व घडामोडीच्या पार्श्र्वभुमीवर जे विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेला बसले त्यांचं मानसिक खच्चीकरण निश्चित झालं असेल आणि परिणाम त्याचे निकालातुन दिसुन येतील. कारण एमपीएससीची परीक्षा म्हणजे एखाद्या खेड्यात बोर्डाची परीक्षा व्हावी अशी नसते. भावी प्रशासनातले अधिकारी जिथे भरले जातात तो मुख्य दरवाजा म्हणजे एमपीएस्ासीची परीक्षा. सरकार सर्वसामान्य जनतेसाठी काही करत नाही. आडमुठी भुमिका घेते आणि आता एमपीएससीच्या परीक्षा मागे-पुढे करत तरूणाईच्या भावनेशी का खेळत आहे? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचणीसाठी मनपाची सहा पथके तैनात
- सामान्यांवर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या मनपाने महावितरणचेच थकवले होते कोटी रुपये
- २ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय; वीजबिल वसुलीवरून राजू शेट्टी भडकले
- मोदींना कडाडून विरोध करणारे यशवंत सिन्हा राजकारणात पुन्हा सक्रीय का झाले ?
- कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या पथकालाच ठोठावला दंड!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

